अतिक्रमणधारकांच्या घरांचे नियमन, मूलभूत सुविधा आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष
बारामती, दि. २३ : बारामती शहरातील विविध नागरी समस्या आणि नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांवर वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास तुकाराम निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार (दि. २३) पासून बारामती नगर परिषदेसमोर बेमुदत चक्री धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून प्रामुख्याने १ जानेवारी २०११ पूर्वीची पात्र निवासी अतिक्रमणे शासन निर्णयानुसार नियमित करणे, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील नागरिकविरोधी ठराव रद्द करणे, विविध नगरवस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, सार्वजनिक स्वच्छता व शौचालयांची दुरुस्ती करणे, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारणे तसेच अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांच्या वस्त्यांमधील आरोग्य व नागरी सुविधांचे प्रश्न सोडविणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, शहरातील बॅनर व जाहिरात फलकांबाबत नियमांची अंमलबजावणी आणि कंत्राटी कामगारांच्या वेतन व सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. नगर परिषद प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या निवेदनांवर त्वरित कार्यवाही करून मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.










