बारामती : शहरात विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या ‘रॅपिडो’ बाइक टॅक्सी सेवेविरोधात बारामतीतील रिक्षा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सेवेवर तातडीने बंदी न घातल्यास येत्या १ डिसेंबर २०२६ पासून बारामती शहर व तालुक्यात बेमुदत रिक्षा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. या निर्णयामुळे आगामी काळात शहरात रिक्षाचालक विरुद्ध बाइक टॅक्सी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
काय आहे नेमकी मागणी?
शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बाइक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसाय मोठ्या अडचणीत आला असून, रिक्षाचालकांच्या दैनंदिन रोजगारावर थेट गदा येत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना तसेच शहर व तालुका ऑटो रिक्षा महासंघ, बारामती यांच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह स्थानिक प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित
बाइक टॅक्सी सेवेला विरोध करताना संघटनांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बेकायदेशीर बाइक टॅक्सी सेवा तातडीने बंद करण्यात यावी. बाइक टॅक्सी चालकांची कायदेशीर नोंदणी आणि व्यावसायिक वाहन परवान्यांची तपासणी व्हावी. प्रवाशांची सुरक्षा, विमा संरक्षण आणि वाहतूक नियमांचे पालन होते की नाही, याची कठोर पडताळणी करावी या मागण्यांचा समावेश आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
दिलेल्या निवेदनावर आणि मागण्यांवर प्रशासनाने वेळेत ठोस कार्यवाही न केल्यास १ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारण्यावर रिक्षा संघटना ठाम आहेत. त्यामुळे आता परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासन यावर काय तोडगा काढणार आणि संभाव्य रिक्षा बंदचा फटका बारामतीकर प्रवाशांना बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










