दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर देवाच्या यात्रा उत्सवाला मंगळवार (दि. २४) पासून सुरुवात होणार असून बुधवार (दि. २५) पर्यंत दोन दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव समितीने जोरदार तयारी केली असून भाविक, ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यात्रेनिमित्त श्री नागेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत. गावातील कचरा हटविण्यासह विविध ठिकाणच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. श्री नागेश्वर देव मंदिराचा परिसरही स्वच्छ करण्यात आला असून गावातील मुख्य चौकात व नागेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने मंदिर परिसर उजळून निघाला आहे.
यात्रेचे विशेष आकर्षण असलेला जंगी कुस्ती आखाडा बुधवार (दि. २५) रोजी सायंकाळी ४ वाजता गावातील आखाडा मैदानावर रंगणार आहे. पाटसचा कुस्ती आखाडा परिसरात प्रसिद्ध असून या आखाड्यात नामवंत मल्लांच्या अटीतटीच्या आणि निकाली कुस्त्या पाहण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळणार आहे. विविध वजनगटांमध्ये कुस्त्यांचे सामने आयोजित करण्यात येणार असून मल्लांच्या कौशल्याचा आणि ताकदीचा कस या आखाड्यात लागणार आहे.
यात्रेनिमित्त बुधवार (दि. २५) रोजी सकाळी १० ते दुपारी २ आणि रात्री ९ ते २ या वेळेत प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक परंपरा, लोककला आणि कुस्तीचा थरार अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी यात्रेकरूंना अनुभवता येणार आहे.
सुरक्षा व सुविधांसाठी मागणी
दरम्यान, पाटसच्या ग्रामदैवत श्री नागेश्वर देवाच्या दोन दिवशीय यात्रेतील गर्दी पाहता यात्रा उत्सव समितीच्या वतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक रुग्णवाहिका तसेच महिलांसाठी स्वच्छतेचे युनिट व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. तसेच नागेश्वर मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत वाहतुकीची कोंडी होणार नाही त्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्याची मागणी होत आहे.
जड वाहने व दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी पाटस – कानगाव रोड ते पुणे – सोलापूर महामार्गावरून प्रवास करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी यात्रा कमिटीने स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. तसेच नागेश्वर मंदिर परिसर आणि यात्रेचे आकर्षण असलेले पाळणे, खेळण्याचे व्यवसाय याठिकाणी हुल्लडबाजी टाळण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.










