बारामती, दि. २३ (प्रतिनिधी): जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ व पंचक्रोशीतील शेतकरी आज (सोमवार, दि. २३) सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत. “आता नाही, तर परत नाही” असा एल्गार पुकारत ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
शेतकरी संघर्ष समिती, देऊळगाव रसाळ यांच्या वतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली असून, यामध्ये गावातील सर्व शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सुपे वितरण कुंड ते देऊळगाव रसाळपर्यंत योजनेची संपूर्ण बंदिस्त पाइपलाइन करावी आणि बंदिस्त पाइपलाइनचा संपूर्ण गावाचा नकाशा ग्रामस्थांना देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच, गावातील उर्वरित सर्व तलाव व बंधारे या योजनेत समाविष्ट करून, राहिलेल्या शेतकऱ्यांचे भूसंपादन पूर्ण करावे व त्यांना तातडीने मोबदला मिळावा, अशी मागणीही लावून धरण्यात आली आहे.
सुपे वितरण कुंड ते देऊळगाव रसाळ दरम्यान गळतीमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, बेकायदेशीर सायफनिंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बंदिस्त पाइपलाइनमुळे वाचणारे पाणी पुणे महानगरपालिकेला न देता ते कायमस्वरूपी वंचित गावांतील तलावांना शेतीसाठी द्यावे, तसेच ही संपूर्ण योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करावी, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
याशिवाय, बंदिस्त पाइपलाइनचे काम पूर्ण होईपर्यंत कॅनॉलचे लिकेज बंद करून त्याची मशिनद्वारे साफसफाई करावी आणि गावातील अपूर्ण राहिलेल्या पोटचाऱ्यांना बंदिस्त पाइपलाइन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रसाळवाडी येथील तलावाला ‘जळगाव सुपे तलाव’ असे चुकीचे नाव दिले गेले असून, ते रद्द करून ‘रसाळवाडी महादेव मंदिर तलाव’ असे नाव करावे व त्याचा जनाई-शिरसाई सिंचन कार्यक्षेत्रात समावेश करावा, या मागणीसाठी ग्रामस्थ आजपासून आमरण उपोषण करणार आहेत.










