बारामती / शिवनगर : राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुकारलेले ऊस दर आंदोलन आणि दराबाबतची कोंडी यामुळे यंदाचा गाळप हंगाम चांगलाच तापला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकताच, इकडे पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही दराची कोंडी फोडण्यास सुरुवात केली आहे. अगोदरच कोणतीही आंदोलनाची पार्श्वभूमी नसताना सुरुवातीला श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ३५०१ रुपये दर जाहीर केल्यानंतर त्याची राज्यभरात चर्चा झाली होती. आज आता राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद आणि गेटकेनधारकांना प्रतिटन ३९०० रुपये पहिली उचल जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. फक्त कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनधारकांच्या गाळपासाठी आलेल्या उसातून वाहतुकीची रक्कम कपात केली जाणार आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
शनिवारी (दि. २१) शिवनगर येथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार यांनी चालू गाळप हंगामात तुटून येणाऱ्या उसाला प्रतिटन ३९०० रुपये पहिली उचल देण्याची घोषणा केली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
या संदर्भात कारखान्याची उपाध्यक्ष नितीन शेंडे यांनी महान्यूजशी बोलताना सांगितले की, ही पहिली उचल माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद आणि गेटकेनधारक ऊस उत्पादकांना एकसारखीच असेल, फक्त कार्यक्षेत्राबाहेरील दूर अंतरावरच्या गेटकेनधारक ऊस उत्पादकांना दर देताना उसाच्या तेथील वाहतुकीची रक्कम कपात करून दर दिला जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील इतर कारखान्यांवर दबाव वाढला
यंदा हंगाम सुरू झाल्यापासूनच ऊस दरावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे पुणे जिल्ह्यातील कारखाने नेमका काय दर जाहीर करणार, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. ‘छत्रपती’ कारखान्याने ३५०१ रुपयांचा आकडा जाहीर करून कोंडी फोडण्याचा पहिला प्रयत्न केला होता. त्यानंतर आता ‘माळेगाव’ने थेट ३९०० रुपये पहिली उचल जाहीर करत आघाडी घेतली आहे.
माळेगावच्या या निर्णयामुळे बारामती, इंदापूर, दौंड आणि शिरूर तालुक्यातील इतरही साखर कारखान्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आगामी काही दिवसांत इतर कारखाने नेमका कोणता दर जाहीर करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.










