बाजारपेठेतील सततच्या अस्थिरतेमुळे उलाढाल मंदावली; जगदीश कांबळे यांनी मांडली व्यथा
काका यादव, भवानीनगर
जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या तीव्र चढ-उतारामुळे आणि सध्या होत असलेल्या घसरणीमुळे ग्रामीण व निमशहरी भागातील छोट्या सराफ व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोन्या-चांदीचे दर कधी विक्रमी पातळी गाठतात, तर कधी अचानक घसरतात. या अनिश्चिततेचा सर्वाधिक फटका मर्यादित भांडवलावर व्यवसाय करणाऱ्या स्थानिक सराफ व्यावसायिकांना बसत असून, त्यांच्यासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे, अशी खंत सराफ संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जगदीश भालचंद्र कांबळे यांनी व्यक्त केली आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाही दरातील या अस्थिरतेमुळे बाजारपेठेतील खरेदीवर परिणाम झाला आहे. छोट्या सराफ व्यावसायिकांकडे मोठ्या कॉर्पोरेट शोरूम्सप्रमाणे मोठे भांडवल किंवा हेजिंगची (जोखीम संरक्षणाची) साधने नसतात. त्यामुळे तेजीच्या काळात चढ्या दराने खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या साठ्याचे बाजारभाव अचानक कोसळल्यास त्यांना थेट तोटा सहन करावा लागतो. दुसरीकडे, ‘दर आणखी कमी होतील’ या अपेक्षेने ग्राहक खरेदी पुढे ढकलत असून, केवळ विचारपूस करून परत जात असल्याने बाजारपेठेतील प्रत्यक्ष उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.
मोठ्या व्यावसायिकांच्या तुलनेत छोट्या सराफांची आर्थिक क्षमता मर्यादित असल्यामुळे दरातील प्रत्येक चढ-उतार त्यांच्यासाठी कसोटीचा ठरत आहे. त्यातच दुकानाचे भाडे, कारागीर व कामगारांचे वेतन, वाढीव वीजबिल, जीएसटी (GST), हॉलमार्किंगची तांत्रिक पूर्तता आणि बँकांचे व्याज हे दैनंदिन खर्च कायम आहेत. उलाढाल घटल्याने हे खर्च भागवणेही कठीण होत चालले आहे.
अनेक पिढ्यांपासून विश्वासार्हतेच्या जोरावर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनलेल्या या पारंपरिक व्यावसायिकांचे अस्तित्व टिकवून ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. शासनाने आणि संबंधित सुवर्णकार संघटनांनी या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी. छोट्या सराफ व्यावसायिकांसाठी विशेष आर्थिक धोरण आखावे, राष्ट्रीयीकृत बँकांकडून अल्प व्याजदरात आणि सुलभ अटींवर कर्जसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच व्यवसायाला स्थैर्य देणाऱ्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सणसर येथील भाग्यलक्ष्मी सराफचे संचालक व सराफ संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जगदीश भालचंद्र कांबळे यांनी केली आहे.










