किरण माने, मराठी चित्रपट अभिनेते
“सगळं भारी जुळून आलंवतं हो… मुलामुलीची पसंती झालीवती, दोघांनाबी आयटीमध्ये जॉब होता. सगळं जुळलंवतं.”… आजच माझे एक जवळचे नातेवाईक मला सांगत होते. “…पण गुरुजी म्हन्ले साडेअठरा गुण जुळत्यात. आपल्याला जरा जास्त पायजेत. एकुलता एक पोरगा हाय आपला.”
…हल्ली बहुजन कुटुंबांमध्ये लग्नं मोडण्याचं सगळ्यात मोठं कारण कुठलं असंल तर, “पत्रिका जुळत नाही.”
पत्रिकेचा डायनॉसॉर इतका मोठा झालाय, की ‘मनं’ जुळणं लै छाटछूट होऊन बसलंय ! ज्यानं कॉम्प्युटरचा कोड लिहिला त्या इंजिनियरचं आणि जिनं माणसाचं हृदय उघडून ऑपरेशन केलं त्या डॉक्टरनीचं, दोघांचंबी आयुष्य बारा चौकोनांचा एक छाटछूट कागद ठरवतो…? लानत है यार !
गंमत म्हणजे पत्रिकेवरून आपली लग्नं मोडणारे काही गुरुजी स्वतःच्या घरात म्हणतात, “माणूस जुळला की बास.” त्यांची मुलं लव्ह मॅरेज करतात तेव्हा मंगळ आडवा येत नाही की गुरु खोडा घालत नाही.
शिकलेल्या बहुजनांनो, सगळी पृथ्वी सोडून हे ‘ग्रह’ फक्त आपल्याच घरांवर डूख धरून असतात का?
हे लोक दोष ग्रहात काढतात आणि त्या ग्रहाचं ‘जुगाड’ होतं आपल्या खिशातल्या नोटांवरून… याला ज्योतिष म्हणत नाहीत भावांनो, धंदा म्हणतात ! …फक्त एकदा फॅमिली कोर्टात चक्कर मारा. पत्रिका शंभर टक्के जुळलेली जोडपी आज न्यायाधीशासमोर उभी आहेत. घटस्फोटाचे अर्ज देऊन चकरा मारताहेत. संसार पत्रिकेतल्या गुणांनी नाही, गुणी माणसांनी टिकतो !
पत्रिका हे थोतांड आहे. आत्ताच्या आत्ता कचराकुंडीत फेकून द्या. मुलामुलीचा स्वभाव जुळतोय का बघा… विचार पसंत पडताहेत का… एकमेकांबद्दल आदर वाटतोय का… व्यसनं आणि आरोग्य तर बघाच बघा ! मंगळ तुमचं कायबी वाकडं करू शकत नाय… त्यापेक्षा महत्त्वाची असलेली रक्ताची तपासणी करा. बहुजन भावाबहीणींनो, करोडो किलोमीटर दूर असलेल्या ग्रहताऱ्यांच्या भीतीपोटी नाही, तर तुमच्याकडं असलेल्या विवेकानं लग्न ठरवा…










