राजेंद्र झेंडे, दौंड : आदिवासी पारधी समाजातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचा जळीत ऊस गाळपासाठी नेण्यास निराणी ग्रुप संचलित भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने दौंड तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि साखर आयुक्तांकडे लेखी निवेदन देऊन तात्काळ पंचनामा करण्याची व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
दौंड तालुक्यातील पाटस-बिरोबावाडी हद्दीतील शेतकरी भालचंद्र काळे यांच्या गट नंबर ७७ मधील सुमारे अर्धा एकर ऊस काढणीस आला होता. या उसाची रीतसर नोंद भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याकडे करण्यात आली होती. ऊस तोडणीस आल्यानंतर काळे यांनी कारखान्याच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळवले असता, कर्मचारी सतीश वाबळे यांनी “तुम्ही ऊस जाळून टाका, त्यानंतर आम्ही तो गाळपासाठी घेऊन जातो,” असे सांगितले. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शेतकरी काळे यांनी उभा ऊस जाळला. मात्र, ऊस जाळल्यानंतर भ्रमणध्वनीवरून वारंवार विनंती करूनही कारखाना प्रशासनाकडून ऊस तोडणी व वाहतुकीस टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा जळीत ऊस शेतातच पडून असल्याने शेतकरी काळे यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या गंभीर प्रकाराबाबत त्यांनी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, पुणे जिल्हाधिकारी आणि साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, नुकसानग्रस्त उसाचा तातडीने पंचनामा करावा, संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि कारखान्याकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत कारखान्याची बाजू जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.










