दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस टोल प्लाझा येथील सर्व टीसी (TC) व एलए (LA) कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. १९) सकाळी अचानक महामार्गावर ठिय्या मांडत कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत आंदोलक कर्मचाऱ्यांनी निषेधाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
पगारवाढ व इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित पीएसईपीएल (PSEPL) कंपनीकडे कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत तीन वेळा पत्रव्यवहार केला होता. या विषयावर चर्चा करण्यासाठी कंपनीकडून १० दिवसांची, अर्थात २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागण्यात आली होती. मात्र, दिवाळीचा सण होऊनही प्रशासनाने पगारवाढीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी यावेळी केला. पगारवाढीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून, त्यातूनच हे ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. यापुढे कंपनीने दिलेल्या मुदतीत पगारवाढीबाबत ठोस व समाधानकारक अंतिम निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे.










