सासवड (ता. पुरंदर) : घरगुती वादातून नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे उघडकीस आली आहे. (दि. २० नोव्हेंबर रोजी) दिराने आपल्याच भावजयीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला रामदास काकडे (रा. पांगारे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे.
उज्वला काकडे या हडपसर येथील साधना विद्यालयात शिक्षिका म्हणून सेवारत होत्या. त्या नेहमीप्रमाणे पांगारे गावाकडून हडसरकडे निघाल्या होत्या. पांगारे येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या पासून अगदी दीडशे फूट अंतरावर त्यांच्या दिरानेच मालवाहतुकीच्या कॅरी मॉडेलच्या टेम्पो ने पाठीमागून उज्वला काकडे यांना धडक दिली. धडक देऊन न थांबता दिराने पाईपने चेहऱ्यावर व शरीराच्या इतर भागावर वार केला आणि डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला.
काही दिवसांपूर्वीच उज्वला यांचे पती रामदास यांचे आजारात निधन झाले. उज्वला यांचे माहेर बारामती तालुक्यातील वढाणे हे गाव आहे. कालच उज्वला यांच्या सातवीतील मुलीचा वाढदिवस होता. या वाढदिवसादिवशीच संपत्तीच्या वादावरून घरातीलच नातेवाईकाने त्यांचा खून केल्याने संपूर्ण पुरंदर तालुक्यात शोककळा पसरली होती.










