संतोष शेंडकर, सोमेश्वरनगर
सामान्य माणसांसाठी अजितदादा म्हणजे ‘आपला माणूस’ आणि ‘कामाचा माणूस’. दादांच्या विमान अपघातानंतर बारामतीच काय, पण राज्यभरातली जनता अजूनही हळहळत आहे. अजूनही दादांचा विमान अपघात हा अपघातच असेल, यावर लोकांचा विश्वास बसत नाही. तो काळाकुट्ट दिवस मी स्वतः बारामतीत फिल्डवर राहून प्रचंड मेहनतीने कव्हर केलाय. म्हणून लोकांप्रमाणे मलाही अनेक शंका आहेत.
लोकांच्या मनातल्या साध्या साध्या प्रश्नांना गेली नऊ-दहा महिने उत्तरे मिळालेली नाहीत. लोकांना विमानाचं, प्रोटोकॉलचं आणि तपास यंत्रणांबद्दलचं सखोल ज्ञान नसतं; पण त्यांचे काही तार्किक (लॉजिकल) प्रश्न आहेत. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे राज्यभरात आमदार रोहित पवारांचा अपवाद वगळता कुणीही याबद्दल बोलत नाही… हे नेमकं कशाचं आणि कुणाचं भय आहे?
या घटनेबाबत सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत. बारामती शहरातल्या सीसीटीव्हीत काही किलोमीटरवर विमान अपघाताची घटना कैद झाली, मग प्राथमिक अंदाजात हवामानाची दृश्यमानता कमी होती हे कसे? एएआयबीने (AAIB) प्राथमिक अहवालात झाडाला धडकून विमान कोसळले असे नमूद केले; पण ते झाड नेमकं कुठंय, कारण आमच्या विमानतळावर झुडपंसुद्धा नाहीत. विमानातली सहवैमानिक ‘ओह शिट’ का म्हणाली आणि मुख्य पायलट काहीच का बोलला नाही?
पायलटला संबंधित रनवेवर विमान उतरवणे अडचणीचे असते असे सांगूनही विमान तिथेच का उतरवले गेले? ब्लॅक बॉक्स जळणे अशक्यप्राय बाब असते (११०० डिग्रीपर्यंत तो सुरक्षित असतो), तरी तो जळाला असल्याचे का सांगितले गेले आणि त्यातील डेटा मिळवण्यासाठी तो अमेरिकन कंपनीकडे दिला म्हणतात, त्याचे पुढे काय झाले? प्रत्यक्षदर्शींनी विमान खाली उतरण्याआधी विचित्र आवाज करत होते असे सांगितले, त्याचे काय झाले आणि विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन का होते?
एवढेच नव्हे तर दादांचा गाडीऐवजी अचानक विमानाचा प्लॅन कसा ठरला आणि सकाळी-सकाळी आधी ठरलेला पायलट नेमक्या कुठल्या गर्दीत हरवला म्हणून पर्यायी पायलट पाठवला गेला, हेही कोडेच आहे. अजितदादांचे विमानात बसतानाचे फुटेज माहिती अधिकारात का नाकारले गेले? अजितदादांचे ‘देवगिरी’ ते विमानतळ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस महासंचालकांना मिळणार नाही का? साधे कॉन्स्टेबलसुद्धा एका दिवसात सीसीटीव्ही फुटेज गोळा करून चोरीचा छडा लावतात, मग ते फुटेज माहिती अधिकारात का मिळत नाही?
अपघातापूर्वी काही दिवस संबंधित कंपनीने पन्नास कोटींचा विमा उतरवला होता, तो केवळ योगायोग होता का आणि पायलटला किती कोटी मिळणार? साधी चापट मारली तरी एफआयआर (FIR) होतो, मुंबईतल्या विमान अपघाताचा एफआयआर होतो, मग दादांच्या विमान अपघाताचा एफआयआर का होत नाही? जी बारामती दादांनी घडवली, तिथेपण एफआयआर दाखल होत नाही का?
अपघातानंतरही सरकारकडून संबंधित विमान कंपनीची देणी तत्काळ दिली गेली आणि त्या कंपनीला पुन्हा काम दिले गेले, हे खरे आहे का? सीआयडी, पोलीस, एएआयबी आणि डीजीसीए यांनी आतापर्यंत नेमका काय तपास केला हे कोण सांगणार? संबंधित विमान कंपनीचे मालक, व्यवस्थापन किंवा कर्मचारी यांच्यापैकी कुणावर गुन्हा दाखल झाला किंवा कुणाला निलंबित केले का? राज्याचा अत्यंत मोठा नेता, उपमुख्यमंत्री गेलाय… तरीही तपासात इतका हलगर्जीपणा, निष्काळजीपणा, हतबलता आणि अळमटळम का चालली आहे? कुटुंबाने मागणी करूनही सीआयडीच्या तपासाला गती येत नाही आणि हा तपास सीबीआयकडे का दिला जात नाही? अजितदादांच्या अपघाताच्या तपासापेक्षा विमान कंपनीचे मालक इतके महत्त्वाचे कसे आणि त्यांच्यावर काहीच कारवाई का नाही? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आजही कायम आहेत.
’दोषींवर कडक कारवाई केली जाईल’, ‘दोषींना शोधून काढू’, ‘लवकरच तपास करू’ या शाब्दिक बुडबुड्यांना आता काहीच अर्थ उरलेला नाही. बारामतीकर ही जखम कधीच विसरणार नाहीत. त्यामुळे केवळ पुतळा अनावरण नको, तर तपासातील प्रगतीचे कागद दाखवा. लोकांचा संभ्रम आणि शंका-कुशंका वाढतच चालल्या आहेत. रोहित पवार जर चुकीचे बोलत असतील, तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या किंवा त्यांच्या तोंडावर तपासातील प्रगतीचे पुरावे फेका.
आता स्पष्ट दिसतंय की रोहित पवारांनी आर-पारची लढाई छेडली आहे आणि मोठी रिस्क घेतली आहे. बडे नेते-दिग्गज त्यांच्यासोबत असतील असे सध्या तरी वाटत नाही. ज्या सामान्य जनतेला दादांचा आधार वाटत होता, त्या जनतेनेच आता सत्य बाहेर येईपर्यंत रोहित पवारांना साथ द्यायला हवी. येत्या २८ जानेवारीपर्यंत या प्रकरणाचे पूर्ण सत्य उजेडात यायला हवे. अन्यथा, ज्यांना दादांमुळे आमदारकी, खासदारकी किंवा कुठलीही पदे मिळाली आहेत, त्यांतले जे सच्चे दादाप्रेमी असतील त्यांनी सामूहिक राजीनामे द्यायला हवेत. दादांसाठी सामान्य माणूस आज रडतोय, तेव्हा थोडा त्याग नेत्यांनीही करावा.










