दौंड : महान्यूज लाईव्ह
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. पुणे जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये मंगळवारपासून (दि. १७) सुरू झालेल्या या आंदोलनाचे तीव्र पडसाद दौंड न्यायालयाच्या आवारात पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत न्यायालयाच्या बाहेर आंदोलन सुरू ठेवल्याने दैनंदिन न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, त्याचा मोठा फटका पक्षकार आणि वकील वर्गाला बसत आहे.
सुनावणी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी ग्रामीण भागातून दौंड न्यायालयात आलेल्या पक्षकारांना काम न होताच निराश होऊन परतावे लागत आहे. न्यायालयाच्या पायऱ्या चढूनही कामे रखडत असल्याने सामान्य नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असून, त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संपाचा परिणाम केवळ पक्षकारांवरच नव्हे, तर वकिलांच्या दैनंदिन कामकाजावरही झाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, नोंदी, दाखले आणि इतर प्रशासकीय कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. न्यायप्रक्रियेतील हा विलंब टाळण्यासाठी शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक तोडगा काढावा, जेणेकरून संप मागे घेतला जाईल आणि न्यायालयाचे कामकाज पूर्ववत सुरू होईल, अशी अपेक्षा पक्षकार व वकील वर्गातून व्यक्त केली जात आहे.










