मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य व केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील बहुचर्चित ‘मफलरवाला नेता’ दुसरे तिसरे कोणी नसून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. अपघातामागे मुख्यमंत्र्यांचा संबंध नसला, तरी ते संबंधित ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी आपल्या आरोपांचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री नायडू आणि व्हीएसआर कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांच्याकडे वळवला. रोहित सिंग यांच्या लग्नाला मुख्यमंत्री उपस्थित होते, याचा संदर्भ देत कोण कोणाला वाचवत आहे हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. तसेच, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री नायडू यांचेही व्हीएसआरशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचे मुंबईतील कार्यालय बांधणाऱ्या नमन कंपनीचे जयेश शहा यांचेही या कंपनीशी संबंध असून, या कंपनीच्या पाठीशी अनेक बडी मंडळी असल्याचा दावा पवार यांनी केला.
व्हीएसआर कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर बोट ठेवताना रोहित पवार यांनी अनेक धक्कादायक आकडेवारी मांडली. या कंपनीच्या एकूण २७ उपकंपन्या असून त्याद्वारे ८८६ कोटी रुपयांचे रोख (कॅश) व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, ते विमान ४० कोटी रुपये रोख देऊन खरेदी करण्यात आले होते. चांगली विमाने मिळावीत यासाठी निविदा (टेंडर) काढण्याची अजित पवार यांची इच्छा होती; मात्र केंद्रीय मंत्रालयाने ती रद्द करून हे टेंडर व्हीएसआर कंपनीला दिले. धक्कादायक बाब म्हणजे, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारने याच कंपनीला १६८ कोटी रुपये दिले आहेत, असे पवार म्हणाले.
कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि त्यांची मुले रोहित व राहुल सिंग यांच्यावरही पवार यांनी गंभीर आरोप केले. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या दोन दिवसांत व्हीएसआरने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ‘कोडॅक ब्लॅक’ या रॅपरकडून १८ कोटी रुपयांचे घर विकत घेतल्याचे ते म्हणाले. तसेच, अलास्का येथील ‘उटाह अलायन्स’ कंपनीत व्ही. के. सिंग यांच्या मुलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीशी भागीदारी असून, या मंडळींकडून विमानातून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
तपासाच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करताना रोहित पवार यांनी सीआयडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणी कर्नाटकात ‘झिरो एफआयआर’ दाखल करून सीआयडीकडे पाठपुरावा केला, मात्र अद्याप ठोस तपास झालेला नाही. खरात प्रकरणाशी याचा संबंध आहे का, याचा तपास झाला नसून माहिती अधिकारातही माहिती नाकारली जात असल्याचे ते म्हणाले. या अपघाताचे खापर शेवटी पायलटवर फोडले जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. “मी पदासाठी राजकारणात आलो नाही. जर स्वतःच्या काकाला न्याय देऊ शकलो नाही, तर सामान्य जनतेला काय न्याय देणार? यासाठी मला कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल,” अशी भावनिक भूमिका मांडत त्यांनी या लढ्याचा निर्धार व्यक्त केला.










