पुणे : सोन्याच्या दागिन्यांवर सरकारी ‘हॉलमार्क’चा शिक्का पाहून ग्राहक निर्धास्तपणे सोने खरेदी करतात; मात्र याच विश्वासाचा गैरफायदा घेतला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांच्या ताज्या मसुदा अहवालातून भारतीय मानक ब्यूरोच्या (BIS) कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. गेल्या पाच वर्षांत बीआयएसने देशभरातील ८३ टक्क्यांहून अधिक नोंदणीकृत सराफा दुकानांची कोणतीही तपासणी केली नसल्याचे या अहवालात उघड झाले असून, यामुळे हॉलमार्क सोन्याच्या शुद्धतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासकीय नियमांनुसार, भारतीय मानक ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी वर्षातून किमान एकदा तरी प्रत्येक नोंदणीकृत ज्वेलर्सच्या दुकानाला भेट देऊन तेथील सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासणे बंधनकारक आहे. परंतु, २०२०-२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीचा लेखाजोखा मांडणाऱ्या कॅगच्या अहवालातून हे नियम केवळ कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. एकट्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा विचार केल्यास, देशभरातील २८,८६५ परवानाधारक सराफांपैकी केवळ ५,४४४ दुकानांचीच तपासणी झाली आहे. याचाच अर्थ तब्बल ८१.१३ टक्के सराफा व्यावसायिक कोणत्याही सरकारी तपासणीशिवाय आपला व्यवसाय करत आहेत.
हा निष्काळजीपणा केवळ सराफा पेढ्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून, ज्या हॉलमार्किंग केंद्रांवर (AHCs) सोन्याची शुद्धता तपासून ६ अंकी ‘एचयूआयडी’ (HUID) क्रमांक दिला जातो, त्या केंद्रांवरही बीआयएसचे नियंत्रण नसल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. हॉलमार्किंग केंद्रांच्या देखरेखीसाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टामध्येही बीआयएस तब्बल ४३.७ टक्क्यांनी पिछाडीवर राहिले आहे. प्रत्यक्ष शुद्धता प्रमाणित करणाऱ्या केंद्रांचीच जर नियमित तपासणी होत नसेल, तर बाजारात विकल्या जाणाऱ्या दागिन्यांच्या खात्रीशीरपणाची हमी कोण घेणार, असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या देशातील ३९८ जिल्ह्यांमध्ये विना-हॉलमार्क सोने विकण्यास सक्त बंदी असून, देशभरात सुमारे २.३ लाख सराफा दुकाने बीआयएसकडे नोंदणीकृत आहेत. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने हॉलमार्किंग अनिवार्य केले होते; मात्र यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे ८० टक्क्यांहून अधिक दुकाने तपासणीच्या कक्षेबाहेरच राहिली आहेत. या गंभीर दुर्लक्षामुळे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक फसवणूक होण्याची आणि त्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची भीती व्यक्त होत आहे.










