बारामती : शहरातील विवेकानंद नगर परिसरात राहणारे ६४ वर्षीय व्यापारी संजय धर्मीचंद रायसोनी हे आपल्या नातेवाईकांच्या मोबाईलवर आत्महत्येचा इशारा देणारा संदेश पाठवून अचानक घरातून निघून गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, त्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना सहकार्य करण्याचे तातडीचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद नगर, बारामती येथील रहिवासी असलेले संजय धर्मीचंद रायसोनी (वय ६४, व्यवसाय व्यापार) यांनी नातेवाईकांना आत्महत्येचा संदेश पाठवला आणि ते बेपत्ता झाले. ही बाब लक्षात येताच नातेवाईक आणि पोलीस प्रशासनाकडून त्यांचा सर्वत्र शोध सुरू करण्यात आला आहे. त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक क्षण अत्यंत महत्त्वाचा असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
दरम्यान, बारामती शहर व परिसरातील सर्व नागरिक, व्यापारी बांधव, वाहनचालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सतर्क राहून या शोधकार्यात मदत करावी, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले आहे. संजय रायसोनी हे कोणासही आढळून आल्यास किंवा त्यांच्या ठावठिकाण्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ ९९७०७०६९५३ या मोबाईल क्रमांकावर अथवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी कळवले आहे. तसेच, नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त प्रसारित करून एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.










