तानाजी काळे, (पळसदेव ता. इंदापूर 9423534515)
पहाटेच्या गाढ निद्रेत असताना पत्नीने दिवाळीच्या अभ्यंगस्नानाची हाक मारून आठवण करून दिली. मी ‘हो’ म्हटलं आणि पुन्हा कुस बदलली. पण डोळ्यांवर झोपेची पाखरं विसावलेली असतानाच मन मात्र कित्येक वर्षांपूर्वीच्या धुक्यात हरवलेल्या दिवाळीत जाऊन पोहोचलं. स्मृतींच्या पडद्यावर बालपणीच्या दिवाळीचं पहिलं अभ्यंगस्नान अलगद उमटलं. खरं तर, ती दिवाळी आणि आजची दिवाळी यांच्यात काळाच्या ओघात बराच मोठा बदल झाला आहे. सणाचं रूप पालटलं, जगण्याच्या तऱ्हा बदलल्या; पण मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवलेल्या त्या बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी आजही तितक्याच टवटवीत आहेत.
दिवाळीच्या आदल्या रात्रीच घरातली भांडी आणि घरासमोरचा पाण्याचा रांजण भरून ठेवला जायचा. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे अंगणात चूल पेटायची. तिच्यावर भलंमोठं पातेलं चढवलं जायचं. चुलीतल्या लाकडांचा जाळ आणि त्यातून उसळणाऱ्या ठिणग्यांच्या प्रकाशात पाणी तापायला लागायचं. मग एकामागून एक घरातल्या प्रत्येकाची पहिली आंघोळ व्हायची. गडीमाणसांची आंघोळ घरासमोरच्या पटांगणात शिळा मांडून तयार केलेल्या आडोशाच्या बाथरूममध्ये व्हायची.
त्या पहाटेच्या कुडकुडणाऱ्या थंडीत आम्ही घरातली सगळी मंडळी अंगावर थंडीची शिरशिरी घेत आंघोळीच्या नंबरची वाट पाहत उभे असायचो. पहाटेच्या धुक्यातून डोकावणारा दिवस आणि अंगाला बोचणारी थंडी यांच्यात आमच्या बालपणाची ती दिवाळी अलगद फुलत जायची. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला अंगाला लावण्यासाठी वासाचा साबण असायचा. ‘जय’ नावाचा तो साबण!
दिवाळी आली की त्याचं दर्शन व्हायचं. वर्षभर वाट पाहून मिळालेल्या त्या साबणाचं आम्हा पोरांना मोठंच अप्रूप असायचं. धुक्यातल्या कुडकुडत्या थंडीतही त्याचा दरवळ मनाला सुखावून जायचा. साबण फोडताना त्याच्या कागदाचा सुवास घ्यायचा, तो कागद पुढे वहीत जपून ठेवायचा. अंगावरच्या फेसाचा वास घ्यायचा आणि तो सुगंध मनाच्या एखाद्या हळुवार कप्प्यात अलगद साठवून ठेवायचा.
आंघोळ झाल्यानंतर आई डोक्याला वासाचं तेल लावायची. त्याचाही सुगंध दिवसभर अंगभर दरवळत राहायचा. मी आंघोळीला कधी एकटा जात नसे. माझे वडील, आबा आंघोळीला गेले की मी त्यांच्या पाठोपाठ जायचो. कपडे काढून त्यांच्या पुढ्यात उभा राहायचं. माझा बाप आधी मला आंघोळ घालायचा आणि नंतर स्वतःची आंघोळ उरकायचा. बाप आंघोळ घालताना त्यांच्या रापलेल्या, घट्टे पडलेल्या हातांच्या बोटांनी माझ्या पायांच्या बोटांमधल्या खाचखळग्यांत साचलेली चिखलमाती घासून काढायचा.
शेतात राबून कणखर झालेल्या त्या हातांचा स्पर्श माझ्या लहानशा पायांना अलगद स्वच्छ करायचा. त्या हातांवर कष्टांची खडबडीत रेषा उमटलेली; पण माझ्यासाठी त्याच हातांत मायेचा विलक्षण मऊपणा होता. बापाच्या त्या स्पर्शात वात्सल्याची अशी ऊब होती की, थंडीची बोचही क्षणभर विसरून जायला व्हायचं. कधी आई आंघोळ घालायला आली तर ती शेतात जायच्या घाईगडबडीत माझी आंघोळ उरकायची. हात-पाय दगडाने घासायची. तो दगड कधी अंगावर काचायचा, कधी ओरखडे उठायचे. त्यामुळे मी आईकडून आंघोळ करून घेण्यापेक्षा आबांच्या आंघोळीचीच वाट पाहायचो. आबा आंघोळीला गेले की त्यांच्या पुढे जाऊन उभा राहायचो. दिवाळीतही माझा हाच नित्यक्रम असायचा.
कधी कधी दिवाळीच्या पहाटेला दाट धुकं पडलेलं असायचं. आमची काळेवाडी भीमा नदीच्या अगदी काठावर. नदीच्या उबदार पाण्यावर गुलाबी थंडीची दुलई पसरलेली असायची. अधूनमधून धुक्याचे पुंजके नदीच्या पाण्यावर तरंगत राहायचे. काही काळासाठी नदीचं अस्तित्वच त्या धुक्याच्या पांढऱ्याशुभ्र पडद्याआड हरवून जायचं. पुढचं काहीच दिसायचं नाही. अगदी पाच-दहा पावलांवरचंही दिसणं मुश्कील व्हायचं. मग अंदाज घेत, पावलं जपून टाकत चालावं लागायचं.
दिवाळीच्या अशाच एका धुक्याच्या पहाटे कोण कुठे आंघोळीला गेलं आहे, हेही कळायचं नाही. अशा वेळी मी माझ्या बापाच्या आवाजाची चाहूल घेत त्यांना शोधायचो. धुक्याच्या दुलईत हरवलेल्या माणसांमध्ये माझ्या बापाचा आवाजच मला वाट दाखवायचा. अंदाज घेत घेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचो आणि आंघोळीच्या दगडावर जाऊन बसायचो. मग माझा बाप अगदी हौसेने मला आंघोळ घालायचा.
त्या धुक्यात एक वेगळीच गंमत असायची. अवतीभवती पसरलेलं दाट धुकं, चुलीवर तापवलेल्या पाण्याची अंगावर झेपावणारी वाफ, अंगाला बोचणारी गुलाबी थंडी आणि त्या सगळ्यांत मिसळलेला वासाच्या साबणाचा दरवळ… या सगळ्या वातावरणात बापाच्या हातून आंघोळ करून घेण्याचं सुख काही औरच होतं.
अंगाला साबण लावताना त्याचा फेस डोळ्यांत जायचा. डोळ्यांची चुरचुर व्हायची. कधी कधी डोळ्यांतून पाणीही यायचं. पण त्या सगळ्या यातनांपेक्षा दिवाळीच्या पहिल्या आंघोळीचा आनंद मोठा असायचा. त्या आंघोळीची मजाच काही निराळी होती.
आंघोळ झाली की मग फटाक्यांचं वाटप व्हायचं. फटाक्यांच्या सरातील एकेक फटाका वेगळा करून आबा आम्हा बहीण-भावांच्या वाट्याला त्याचे छोटे छोटे ढीग लावून द्यायचे. टिकल्यांच्या डब्याही वाटून दिल्या जायच्या. मग त्या फटाक्यांचा आवाज आणि टिकल्यांच्या उडण्याचा आनंद घेत आमची दिवाळी बहरायची. दिवाळीच्या दिवसांत आई लाडू, करंज्या, धपाटे, चिवडा असे कितीतरी पदार्थ करायची. घरभर त्या पदार्थांचा खमंग सुवास दरवळत राहायचा. दिवाळीचे दिवस अगदी आनंदात जायचे. माहेरपणाला आलेल्या बहिणी-बाळा पुन्हा सासरी परतायच्या. घरातली लगबग ओसरायची आणि दिवाळी संपल्याचं एक अनामिक दुःख मनाला लागायचं.
दिवाळीचे पदार्थही हळूहळू संपायचे. शेवटी थोडाफार चिवडा आणि चिवड्याच्या डब्याच्या तळाशी शिल्लक राहिलेला मसाला एवढंच उरायचं. त्या मसाल्यातून चिवडा बाजूला काढून उरलेला मसाला चिवड्यासोबत चवीने संपवून टाकायचा. शाळेची सुट्टी संपायची आणि पुन्हा शाळेचे दिवस सुरू व्हायचे. त्या दिवाळीच्या काळाला आता बरीच वर्षं लोटली. काळ पुढे सरकला, पिढ्या बदलल्या; पण पाच-पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दिवाळीच्या आठवणी मनाच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत. माझ्या बापानं घट्टे पडलेल्या रापलेल्या हातांनी घासलेले माझे हात-पाय, चेहऱ्यावर आणि डोळ्यांत साबण जाऊ नये म्हणून अलगदपणे लावलेला साबण, आंघोळ झाल्यानंतर थंडीने अंग कुडकुडू नये म्हणून धोतराच्या सोग्याने झटकन पुसलेलं माझं डोकं आणि अंग… हे सारं चित्र आजही डोळ्यांसमोर उभं राहतं.
आता बाप जाऊन बरीच वर्षं झाली. बाप गेला त्या दिवशी आभाळ कोसळल्यासारखं झालं होतं. पायाखालची जमीन सरकली होती. धरणीमातेचाही आधार तुटतोय की काय, असं वाटत होतं. बाप गेला आणि सारं काही सुन्न झालं. डोक्यावरचा कणखर हात कायमचा हरपला. आयुष्याच्या वाटेवर चालताना सावलीसारखा सोबत असणारा आधार निघून गेला.
त्यानंतर कित्येक दिवस …..आणि आजही माझी नजर माझ्या बापाला शोधत असते. माझ्या बापाला चार भाऊ होते. त्यापैकी माझ्या वडिलांच्या निधनापूर्वी भाऊ आणि अण्णा या दोन चुलत्यांचं निधन झालं होतं. वडिलांनंतर आप्पा आणि तात्या हे दोन चुलते हयात होते. त्यांच्या चेहऱ्याचं माझ्या वडिलांच्या चेहऱ्याशी विलक्षण साधर्म्य होतं. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मला माझ्या बापाचीच आठवण व्हायची.
मी त्या चुलत्यांच्या चेहऱ्यामध्ये माझ्या बापाचा चेहरा शोधायचो. त्यांना भेटायला जायचो. अधूनमधून ते घरीही यायचे. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की नकळत असं वाटायचं, आपला बापच आपल्या समोर बसला आहे. त्याच्या सहवासात आहोत, त्याच्या सान्निध्यात आहोत. काही क्षणांसाठी तरी बाप जवळ असल्याचा भास व्हायचा. त्या क्षणिक भासात मनाला एक विलक्षण दिलासा मिळायचा. पण काळ कुणासाठी थांबत नाही. पुढे त्या दोन्ही चुलत्यांचंही निधन झालं. आता बाप नव्हता आणि बापाच्या चेहऱ्याशी, देहयष्टीशी साधर्म्य दाखवणारा एकही भाऊ उरला नव्हता.
माझा बाप गुलाबी पालकोलचा फेटा बांधायचा. तो फेटा म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच ओळख होती. सोमवार हा पळसदेवचा आठवडी बाजार. त्या दिवशी आमच्या हायस्कूलला अर्धी सुट्टी असायची. शाळा सुटली की आम्ही पोरं बाजारात जायचो. बाजाराच्या गर्दीत माझ्या बापाचा लाल फेटा शोधायला मला फार वेळ लागत नसे. एखाद्या उंच ठिकाणी उभं राहून मी बाजारभर नजर फिरवायचो. गर्दीत कुठेतरी लाल फेटा दिसला की माझे पाय आपोआप त्या दिशेने वळायचे.
बापाजवळ गेल्यावर खाऊसाठी रुपया-दोन रुपये मागायचो. बापही तेवढ्याच मायेने पैसे द्यायचा. त्या पैशांतून भेळ, गारीगार घेऊन आम्ही घरी परतायचो. दर सोमवारी शाळा सुटली की माझा हा नित्यक्रम ठरलेलाच असायचा. आता मात्र बापाच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेले चुलतेही काळाच्या पडद्याआड गेले होते. तरीही बाजारात येता-जाता कुठे लाल फेट्याचा माणूस दिसला की आजूबाजूला बापच असल्याचा भास व्हायचा. त्या लाल फेट्यात, त्या माणसाच्या चेहऱ्यात माझी नजर बापाला शोधायची. बापाच्या धाटणीचा एखादा माणूस दिसला तरी माझे पाय क्षणभर तिथेच थबकायचे.
काळ बराच लोटला. आता बाजारात लाल फेट्याचा माणूस दिसत नाही. लालच काय, पांढरे, पिवळे फेटे बांधणारी माणसंही काळाच्या पडद्याआड गेली. एकेकाळी गावच्या बाजारपेठेत आणि सार्वजनिक ठिकाणी दिसणारे फेटे आता दिसेनासे झाले आहेत. फेट्यांबरोबरच त्या फेट्यांची शान मिरवणारी माणसंही काळाच्या ओघात हरवून गेली.
बापाच्या लहानपणीचे आणि तरुणपणाचे सवंगडीही हळूहळू एकेक करून काळाच्या पडद्याआड गेले. माझा बाप पळसदेवच्या बाजारपेठेत किंवा श्री. पळसनाथ मंदिरात गेला की त्याची काही ठरलेली बसण्याची ठिकाणं असायची. बाप जिथे बसेल, तिथे त्याच्या भोवती चार-पाच माणसं नेहमी जमायची. गावकुसातल्या त्या माणसांची मला चांगली ओळख होती. बाप जिथे बसायचा, तिथे चार शब्दांची मैफल रंगायची. त्याच्या बोलण्यातला अनुभव, सहजता आणि जगण्याचं शहाणपण ऐकण्यासाठी लहानथोर सगळेच कान देऊन बसायचे.
आजही त्यातली काही माणसं भेटली की मी त्यांच्याशी दोन शब्द बोलतो आणि पुढे निघतो. पण पुढे जाताना नकळत पुन्हा मागे वळून पाहतो. त्या माणसांच्या सहवासात, त्यांच्या गप्पांच्या मैफलीत कुठेतरी बसलेला माझा बाप माझी नजर शोधत असते. तो आता तिथे नाही, हे मनाला ठाऊक असतं; पण तरीही मन त्याला शोधायचं थांबवत नाही.
आज अशाच आठवणींच्या धुक्यात मी हरवलेलो असताना पत्नीने पुन्हा तिच्या अधिकारवाणीने हाक मारली. “अहो… दिवस उगवण्यापूर्वी अभ्यंगस्नान करतो म्हणाला होता ना? उठा लवकर!” तिच्या हाकेने माझी अर्धवट झोपेतली तंद्री भंगली. मी उठलो आणि अभ्यंगस्नानासाठी बाथरूमकडे निघालो. यावर्षी बाहेर धुकं पडलं नव्हतं. पहाट स्वच्छ होती. तरीही मला पुढचं काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. सारं काही धूसर, अस्पष्ट झालं होतं. बाहेर धुकं नव्हतं; पण माझ्या मनात मात्र आठवणींचं दाट धुकं पसरलं होतं.
मी बाथरूमकडे जाताना चाचपडत होतो. पायांना वाट सापडत नव्हती. माझ्या या अवस्थेची चाहूल पत्नीला लागली. “अहो, असं काय करताय? बाथरूम तिकडे आहे. अभ्यंगस्नान करायचं आहे ना?” तिच्या त्या प्रश्नाने माझी तंद्री खाडकन उघडली. मी काहीच बोललो नाही. डोळ्यांवर बाहेरच्या धुक्याची दुलई नव्हती; पण मनात दाटलेल्या आठवणींच्या धुक्याने नजरेभोवती अशी धूसर चादर पसरली होती की, समोरचं सारं काही अस्पष्ट भासू लागलं होतं. जणू डोळ्यांची दृश्यमानताच धुक्याच्या पडद्याआड हरवली होती. क्षणभर मी तसाच स्तब्ध उभा राहिलो.
पहिल्यांदा पापण्यांची अलगद उघडझाप झाली आणि मनाच्या काठावर दाटून आलेले अश्रू बांध फुटल्यागत गालांवर ओघळले. पत्नीच्या नजरेला माझ्या डोळ्यांत दाटलेलं अश्रू दिसू नये, म्हणून तिची नजर चुकवत मी अलगद बाथरूममध्ये शिरलो. बाहेरची पहाट स्वच्छ होती; पण माझ्या अंतर्मनात मात्र बापाच्या आठवणींचं धुकं अधिकच गडद झालं होतं. मी अभ्यंगस्नान करीत होतो; पण माझ्या डोळ्यांच्या कडा पुन्हा पुन्हा त्या जुन्या आठवणींनी ओलावत होत्या. बाहेर धुकं नव्हतं, चुलीवर पाणी तापत नव्हतं, अंगणात आंघोळीची लगबग नव्हती आणि माझ्या पुढ्यात उभा राहून मला आंघोळ घालणारा माझा बापही नव्हता.
तरीही अंतर्मनाच्या गाभाऱ्यात त्या पहाटेच्या धुक्यात बाप पुन्हा एकदा जिवंत झाला होता. त्याच्या रापलेल्या हातांचा स्पर्श, धोतराच्या सोग्याने डोकं पुसण्याची ती माया आणि त्याच्या हातून घेतलेल्या त्या पहिल्या अभ्यंगस्नानाची ऊब पुन्हा एकदा अनुभवत होतो.
आज मी स्वतःच्या हाताने अभ्यंगस्नान करीत होतो; पण मन मात्र त्या धुक्यात हरवलेल्या बापाच्या हातून पुन्हा एकदा शाहीस्नान करून घेत होतं. या शाहीस्नानाला गिझरच्या गरम पाण्याला डोळ्यातील गरम अश्रूही हातभार लावत होते.
(लेखक तानाजी काळे हे इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत तब्बल तीस वर्ष लोकसत्ता या वर्तमानपत्रात त्यांनी लेखन केले आहे. ग्रामीण भाग ग्रामीण ढंग आणि ग्रामव्यवस्थेचा त्यांचा अभ्यास आहे.)











