काका यादव, भवानीनगर
माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना इंदापूर तालुक्यातील उद्धट गावच्या हद्दीत उघडकीस आली आहे. अवघ्या एक ते दोन दिवसांच्या नवजात पुरुष जातीच्या अर्भकाला जन्मानंतर संगोपनाची जबाबदारी टाळण्यासाठी अज्ञात व्यक्तीने ओढ्यातील गवतात निर्वस्त्र आणि बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने, एका स्थानिक नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे या चिमुकल्याचे प्राण वाचले असून, याप्रकरणी वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर २०२६) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उद्धट गावच्या हद्दीतील विशाल गायकवाड यांच्या प्लॉटिंगसमोरील ओढ्याजवळून स्थानिक रहिवासी सुभाष इंगोले (वय ४२) हे जात होते. यावेळी त्यांना ओढ्यातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तात्काळ आपल्या मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात पाहिले असता, ओढ्यातील गवतामध्ये अवघ्या एक ते दोन दिवसांचे नवजात पुरुष जातीचे अर्भक पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत पडलेले त्यांना दिसून आले.
प्रसंगावधानामुळे वाचला चिमुकल्याचा जीव
थंडीच्या दिवसांत रात्रीच्या वेळी ओढ्यात उघड्यावर पडलेल्या या चिमुकल्याची अवस्था पाहून सुभाष इंगोले यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रसंगावधान राखले. त्यांनी तात्काळ बाळाला उचलून स्वतःच्या कपड्यांमध्ये गुंडाळले आणि उपचारासाठी थेट बारामती येथे नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घेतले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वालचंदनगर पोलिसांना दिली.
पोलीस प्रशासनाची तात्काळ दखल
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ दखल घेतली. महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने या नवजात अर्भकाला पुढील योग्य वैद्यकीय उपचारांसाठी बारामती येथील शासकीय महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या चिमुकल्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
अज्ञाताचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथके रवाना
नवजात बाळाच्या जीवितास व आरोग्यास गंभीर धोका निर्माण होईल अशा पद्धतीने त्याला बेवारस सोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माणेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या निर्दयी कृत्यामागील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (बारामती उपविभाग) यांच्या सूचनेनुसार दोन स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांकडून घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून स्थानिक नागरिकांकडे चौकशी सुरू आहे. तसेच बारामती, इंदापूर आणि नातेपुते परिसरातील रुग्णालये व प्रसूतिगृहांमधूनही माहिती संकलित केली जात आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
या घटनेसंदर्भात कोणासही काही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ वालचंदनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.










