राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे सध्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी ॲक्शन मोडवर आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी दौंड पोलीस ठाण्यावर काही दिवसांपूर्वी मोर्चा काढला होता. त्यानंतर दौंड पोलिसांनी दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी छापे टाकून अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली. पोलिसांनी ही कारवाई अद्याप सुरू ठेवल्याचे चित्र आहे.
दौंड पोलीस पथकाने भीमनगर परिसरात COTPA कायद्यान्वये तपासणी मोहीम राबवली. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारापासून १०० यार्डच्या प्रतिबंधित परिसरात असलेल्या पानटपरी आणि तीन किराणा दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले. या कारवाईत शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी सुनील पोपट सोनवणे (वय ५२ वर्षे), रेबीना विल्सन पिंटो (वय ४० वर्षे), अमोल बापूराव सोनवणे (वय ४०, सर्व रा. भीमनगर, दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दौंड तालुक्यातील गिरीम हद्दीतील पोतदार शाळेसमोरील चेअरमन टी सेंटर या पानटपरीमध्ये छापा टाकला असता त्याठिकाणी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी बबन नारायण तांबे, (वय ५२ वर्षे, रा. गिरिम, ता. दौंड, जि. पुणे) याच्या पानटपरीमध्ये विविध प्रकारची सिगारेटची पाकिटे, गायछाप व पंढरपुरी तंबाखू तसेच बिडीची पाकिटे असा एकूण २,५३७ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी शुक्रवारी (दि. १३) रोजी दौंड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सदर पानटपरी पोतदार शाळेच्या १०० यार्ड प्रतिबंधित परिसरात असल्याने तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादन अधिनियम (COTPA) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दौंड पोलिसांनी दिला आहे.










