अमरावती: जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावंगा गुरव येथे मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला आणि कथित मानसिक छळाला कंटाळून एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संदीप अवधूत कर्डे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सावंगा गुरव येथील शेतकरी संदीप कर्डे यांनी खाजगी मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी कंपनीच्या प्रतिनिधींकडून त्यांच्याकडे सातत्याने तगादा लावला जात होता. या वसुलीदरम्यान होणाऱ्या कथित मानसिक छळाला आणि जाचाला संदीप कर्डे हे कमालीचे कंटाळले होते. अखेर या नैराश्यातून त्यांनी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
आमदार रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करत सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही घटना ‘अत्यंत दुःखद आणि संतापजनक’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कर्जवसुलीच्या नावाखाली मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या छळाचा विषय आम्ही सातत्याने मांडूनही सरकार या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं ही सरकारप्रणीत हत्याच आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला सरकार वेसण घालणार नसेल तर ही व्यवस्था नेमकी कुणाच्या हितासाठी काम करतेय? असा प्रश्न पडतो.
कठोर कारवाई आणि मदतीची मागणी
मृत शेतकरी संदीप कर्डे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रोहित पवार यांनी प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीवर कठोर कारवाई करावी. कर्डे कुटुंबालाही शासनाकडून तातडीने भरीव आर्थिक मदत देऊन न्याय मिळवून द्यावा.










