पुणे : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आणि फेरफार नोंदीवर नावाची नोंद करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी घोटावडे येथील महिला मंडल अधिकाऱ्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणी शशांक गुप्ते (वय ५७, पद : मंडल अधिकारी, घोटावडे, रा. सदाशिव पेठ, पुणे) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली आहे.
या प्रकरणातील ४० वर्षीय तक्रारदाराने मौजे केमसेवाडी येथे १२ आर जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर व फेरफार नोंदीवर नाव लावण्यासाठी मंडल अधिकारी रोहिणी गुप्ते यांनी तक्रारदाराशी मोबाइलवरून संपर्क साधला होता. या नोंदी करण्यासाठी स्वतःसाठी आणि तलाठ्यासाठी प्रत्येकी दोन नोंदींचे पाच-पाच हजार रुपये, याप्रमाणे एकूण २० हजार रुपयांची लाच त्यांनी मागितली होती. या प्रकारामुळे तक्रारदाराने २४ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता, रोहिणी गुप्ते यांनी स्वतःसाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी पौड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुप्ते यांना तपासासाठी ताब्यात घेतले असून, न्यायालयाच्या परवानगीने अटकेची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी, तर पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अशोक गवारी यांनी काम पाहिले.










