बारामती : बारामती-मोरगाव मार्गावर धावणाऱ्या एसटी बसच्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस साईडचा पॅनेल दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडा ठेवूनच भरधाव वेगाने धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
काय आहे नेमका प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ एनई ३५७४ (MH 14 NE 3574) क्रमांकाची एसटी बस बारामती-मोरगाव मार्गावर प्रवाशांना घेऊन जात होती. दरम्यान, या बसचा बाहेरील बाजूचा पॅनेल दरवाजा पूर्णपणे उघडा होता. चालकाने याकडे दुर्लक्ष करत उघड्या दरवाजासह बस सुसाट चालवल्याचे दिसून आले. रस्त्यावरून धावताना हा उघडा दरवाजा इतर वाहनांना किंवा पादचाऱ्यांना धडकून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.
प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?
‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीवर सर्वसामान्य प्रवासी सुरक्षित प्रवासासाठी विश्वास ठेवतात. मात्र, अशा प्रकारे दरवाजा उघडा ठेवून बस चालवणे म्हणजे थेट प्रवाशांच्या आणि रस्त्यावरील इतर वाहनचालकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे आहे, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी
या गंभीर प्रकाराची एसटी महामंडळ प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, संबंधित बस चालक आणि जबाबदार कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.










