रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चा ‘एक साडी तिच्यासाठी’ उपक्रम; ‘कोपीवरची शाळा’ टीमचे संयोजन
सोमेश्वरनगर : रोटरी क्लबच्या विविध शाखांच्या वतीने ‘एक साडी तिच्यासाठी’ या सामाजिक उपक्रमांतर्गत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी आलेल्या मजूर महिलांना भाऊबीज निमित्त २ हजार साड्यांची दिवाळीभेट देण्यात आली. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तसेच इकॉनॉमिक अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्यावर ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘कोपीवरची शाळा’ या टीमने या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल नितीन ढमाले होते. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना राजवर्धन शिंदे म्हणाले, ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी स्वतःहून शाळा चालवणारा आणि त्यांच्या महिलांच्या आरोग्याची अखंड काळजी घेणारा सोमेश्वर हा राज्यातील एकमेव कारखाना ठरला आहे.” तर, रोटरीचे प्रांतपाल नितीन ढमाले यांनी मनोगत व्यक्त करताना, आगामी काळात या ऊसतोड मजूर महिलांसाठी भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा मानस बोलून दाखवला.
याप्रसंगी इकॉनॉमिक अँड कम्युनिटी डेव्हलपमेंटचे संचालक वसंतराव मालुंजकर, प्रकल्प संचालक प्रतिभा जगदाळे, सहसंचालक पार्शवेंद्र फरसोले, अतुल गांधी (रोटरी क्लब बारामती), अशोक बसाळे (रोटरी क्लब ऑफ सुपा परगना), मंदाकिनी डोंबाळे (रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल), संदीप टिळेकर (रोटरी क्लब ऑफ पुरंदर), विनोद अग्रवाल (रोटरी क्लब पुणे साउथ), आझाद पटेल व भीमाशंकर जाधव (रोटरी क्लब ऑफ इंदापूर) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘कोपीवरची शाळा’ प्रकल्पाचे समन्वयक संतोष शेंडकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. प्रास्ताविक वसंतराव मालुंजकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अजय दरेकर यांनी केले, तर आभार प्रतिभा जगदाळे यांनी मानले.
विविध रोटरी क्लबचे मोलाचे योगदान : या सामाजिक उपक्रमासाठी तळेगाव, दक्षिण पुणे, पुणे विद्यापीठ, वेस्टएन्ड, सहवास, गोरेगाव, महाड, डेक्कन जिमखाना, दौंड, इंदापूर, बारामती, पनवेल, पुणे कॅम्प, रॉयल, शिवनेरी, सुपा, फोनिक्स, भोसरी, औंध, फार ईस्ट, ईस्ट, मगरपट्टा, चाकण, प्राइड, युवा, एनआयबीएम, पुणे एअरपोर्ट आणि विमाननगर आदी रोटरी क्लब शाखांनी सक्रिय योगदान दिले.










