ज्या पित्याने आयुष्यभर घाम गाळून पाच लेकींचे संसार उभे केले, त्याच पित्याच्या मृतदेहाला खांदा द्यायला मात्र एकाही रक्ताच्या नात्याला वेळ मिळाला नाही. “लांबचा पल्ला आणि प्रवासाची अडचण” अशी तकलादू कारणे पुढे करत पाचही मुली आणि जावयांनी पित्याच्या अंत्यविधीला येण्याचे नाकारले. शेवटी ‘जन सेवा दल’ या सामाजिक संस्थेने अनोळखी बापावर अंत्यसंस्कार केले, तर पोटच्या मुलींनी घरबसल्या व्हिडिओ कॉलवर वडिलांचे तोंड पाहून औपचारिकतेचा कळस गाठला. आधुनिक नात्यांचा बुरखा फाडणारी ही विदारक घटना हरियाणामधील पानिपत येथे घडली आहे.
काय घडले नेमके?
मूळचे मध्य प्रदेशातील सिंगरौली येथील रहिवासी असलेले ६५ वर्षीय सुशील कुमार सिंग पानिपतजवळील दादलाना गावातील राधा स्वामी कॉलनीत राहत होते. पूर्वी रिफायनरीमध्ये काम करणाऱ्या सिंग यांचे अचानक छातीत दुखू लागल्याने निधन झाले. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवून तातडीने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. मात्र, अंतराचे कारण सांगून कोणीही येण्यास उत्सुकता दाखवली नाही.
संस्थेने प्रवास खर्च देऊनही मुलींची पाठ
शवविच्छेदनानंतर मृतदेह ‘जन सेवा दल’ या संस्थेकडे सोपवण्यात आला. संस्थेचे सचिव चमन गुलाटी यांनी कुटुंबाशी संपर्क साधला असता धक्कादायक वास्तव समोर आले. सुशील सिंग यांना पाच मुली आहेत; त्यांपैकी तीन विवाहित असून दोघी अविवाहित आहेत. त्यांची पत्नीही आजारी आहे. सगळ्यात संतापजनक बाब म्हणजे, ‘जन सेवा दल’ने मुलींच्या येण्या- जाण्याचा सर्व खर्च आम्ही करू, तुम्ही फक्त पित्याला शेवटचा निरोप द्यायला या. अशी विनंती केली. तरीही मुली किंवा त्यांच्या जावयांपैकी कोणीही येण्यास तयार झाले नाही. बंगळुरू येथे राहणाऱ्या एका जावयानेही ‘खूप दूर आहे’ असे सांगून हात वर केले.
प्रत्यक्ष येण्याऐवजी मुलींनी संस्थेलाच विनंती केली की, “अंत्यविधी सुरू असताना आम्हाला व्हिडिओ कॉल करा.” शेवटी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ कॉल लावला आणि स्क्रीनवरच लेकींनी जन्मदात्याचे अखेरचे दर्शन घेतले. ‘जन सेवा दल’ने हिंदू रितीरिवाजांनुसार सुशील कुमार सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले. संस्थेचे सचिव चमन गुलाटी यांनी तीव्र दुःख व्यक्त करताना म्हटले, आई-वडील संपूर्ण आयुष्य मुलांचे भविष्य घडवण्यासाठी खर्च करतात. पण आयुष्याच्या शेवटच्या वळणावर स्वतःचे मूलही जवळ नसावे, यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असू शकते? आई-वडिलांप्रती कर्तव्य केवळ ते जिवंत असताना पैशांच्या स्वरूपात मोजायचे नसते; त्यांना सन्मानाने शेवटचा निरोप देणे ही देखील मुलांचीच नैतिक जबाबदारी असते.










