माहिती अधिकारात धक्कादायक वास्तव उघड; ऐन उन्हाळ्यात संपूर्ण राज्यासमोर महासंकट उभे राहण्याची भीती
सातारा : पावसाळा संपून नुकताच हिवाळा सुरू झाला असतानाच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण सावट पसरू लागले आहे. दुष्काळाची दाहकता किती गंभीर व चिंताजनक वळणावर पोहोचली आहे, याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मिळवलेल्या अधिकृत माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील एकट्या माण तालुक्यामध्ये तब्बल ४२ गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
माण तालुक्यातील एकूण १०४ गावांपैकी जवळपास ४० टक्क्यांहून अधिक गावांची तहान आत्ताच टँकरवर अवलंबून असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुरुवातीलाच जर एका तालुक्यात ही भयावह स्थिती असेल, तर ऐन उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्राचे काय होणार, असा अत्यंत गंभीर प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
शासकीय आकडेवारीतून टंचाईची भीषणता उघड
माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी सातारा जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांसंदर्भात प्रशासनाकडून अधिकृत माहिती मागवली होती. या माहितीनुसार, संपूर्ण सातारा जिल्ह्यात सध्या एकूण ५४ गावांना टँकरने पाणी पुरवले जात आहे. यामध्ये सर्वाधिक फटका माण तालुक्याला बसला असून तेथील बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, राजवडी, तोंडले, अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, डंगिरेवाडी, वावरहिरे,
संभूखेड, शिरताव, कारखेल, धुळदेव, भाटकी, पर्यती, पिंगळी बु., मार्डी, ईजबाव, भालवडी, खुटबाव, विरळी, कुरणेवाडी, शेनवडी, बनगरवाडी, पानवण, वरकुटे मलवडी, वारुगड, परकंदी, टाकेवाडी, सुरुरुखानवाडी, शिंदी बु., कोळेवाडी, उकिर्डे, दोरगेवाडी आणि कुकूडवाड या ४२ गावांचा समावेश आहे. याशिवाय खटाव तालुक्यातील मोराळे, मरडवाक, एनकुळ, कणसेवाडी, खातवळ, यलमरवाडी, गारवडी (आवळेपठार), पडळ, पळसगाव या ९ गावांना, तर फलटण तालुक्यातील नाईकबोंबवाडी, गोळेगाव व गोळेवाडी या ३ गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती
ज्या मोसमात विहिरी, बोअरवेल, बंधारे आणि पाझर तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा असणे अपेक्षित असते, त्याच मोसमात शेकडो वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जर हिवाळ्यातच ४० टक्क्यांहून अधिक गावे टँकरवर आली असतील, तर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्ह्यांमधील स्थिती पुढील चार महिन्यांत अत्यंत स्फोटक होण्याची चिन्हे आहेत. फेब्रुवारी ते मे या काळात भूजल पातळी आणखी खालावल्यानंतर केवळ पिण्याच्या पाण्याचाच नव्हे, तर जनावरांच्या चाऱ्याचा आणि उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनून छावण्या उभारण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते.
पाणी आणि पैशांचा जपून वापर करण्याचे आवाहन
सध्या समोर आलेली ही आकडेवारी केवळ प्रशासकीय माहिती नसून आगामी महासंकटाचा लाल दिवा आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे अत्यंत गरजेचे बनले आहे. घरात पाण्याचा अपव्यय टाळणे, वाहने धुणे किंवा अंगणात पाणी शिंपडणे तातडीने थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आगामी दुष्काळाची तीव्रता पाहता बाजारात जीवनावश्यक वस्तू आणि धान्याची टंचाई निर्माण होऊन भाववाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी पुढील काही महिने उपलब्ध पाण्यासहित आपल्याकडील पैसा, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा अत्यंत काटकसरीने वापर करून आर्थिक व सामाजिक नियोजन करावे, असे कळकळीचे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे. वेळीच खबरदारी घेतली नाही, तर आगामी उन्हाळा मानवी वस्तीसह मुक्या जनावरांसाठीही असह्य ठरेल.










