इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून आरोग्य यंत्रणेला काळिमा फासणारी अत्यंत गंभीर बातमी समोर येत आहे. शेटफळगढे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक महिन्यापूर्वी सेवा समाप्त केलेल्या कंत्राटी महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने शासकीय खर्चातून गरिबांसाठी आणलेल्या औषधांवर रातोरात डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी औषधे अचानक संपल्याचे सांगून रुग्णांना परत पाठवले जात होते; मात्र नागरिकांनी संशय घेऊन दवाखान्याचा सीसीटीव्ही तपासताच रात्रीच्या अंधारात औषधांची पोती भरून पळवणारी डॉक्टर कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य व गरजू रुग्णांच्या उपचारासाठी पाठवलेल्या मोफत औषधांची थेट चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार शेटफळगढे प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे. सेवेतून आधीच बडतर्फ करण्यात आलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याने रात्रीच्या सुमारास औषधांची पोती दुचाकी आणि चारचाकीतून लंपास केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.
दोन दिवसांपासून रुग्णांना औषधांअभावी रिकाम्या हाती पाठवले जात असताना, नागरिकांच्या सतर्कतेने हा गैरप्रकार चव्हाट्यावर आणला. दरम्यान, स्थानिक राजकारण्यांकडून प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असून पोलीसही गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याने आरोग्य प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान दीड महिन्यापूर्वी कामावरून काढलेली डॉक्टर पुन्हा रात्रीच्या वेळी केंद्रात कशी शिरली? असा सवाल आता उपस्थित केला जात असून ग्रामीण भागातील रुग्ण उपचारांअभावी औषध न मिळता माघारी जात होते त्यामुळे नागरिकांनी सीसीटीव्ही तपासले, तेव्हा त्यामध्ये महिला आरोग्य अधिकाऱ्याने पोते भरून औषध नेताना समोर आले आहे.
दरम्यान या प्रकरणी इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषध साठा गहाळ झाल्याने चोरीचा संशय व्यक्त करत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोठ्या प्रमाणावर औषध साठा गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, यामागे चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे जिल्हा परिषद तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे।
प्राप्त माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्र शेटफळगढे येथील औषध निर्माण अधिकारी मनिषा अशोक बिसेन या २ नोव्हेंबर रोजी रजेवर होत्या. ३ नोव्हेंबर रोजी त्या कर्तव्यावर हजर झाल्यानंतर त्यांनी केंद्रातील औषध साठ्याची नेहमीप्रमाणे पडताळणी केली असता, उपलब्ध साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचे निदर्शनास आले. हा साठा गहाळ किंवा चोरीला गेल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल सुरेश थोरात यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल थोरात यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) आणि पंचायत समिती इंदापूरचे तालुका आरोग्य अधिकारी (THO) यांच्याकडे ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पत्रव्यवहार केला. शासकीय औषध साठ्यातील हा अपहार गंभीर स्वरूपाचा असून प्रशासकीय स्तरावरून तात्काळ योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
गहाळ झालेल्या साहित्यात महत्त्वाच्या औषधांचा समावेश : प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या १८ प्रकारच्या औषधांच्या यादीनुसार, प्राथमिक उपचारासाठी लागणाऱ्या हजारो गोळ्या व इंजेक्शन्स गहाळ झाल्याचे नमूद आहे. दरम्यान या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून प्रशासनाने तातडीने यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.










