मुंबई : भारतीय जनता पक्ष हा एक अत्यंत अजब पक्ष आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत सर्वत्र सत्तेत असूनही ते ‘लोकशाही वाचवा’ म्हणून मोर्चे काढत आहेत. सत्ताधारी पक्षच विरोधकांच्या विरोधात मोर्चे काढत असल्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असावे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
गोकुळच्या निकालावरून भाजपचा दुटप्पीपणा उघड
कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीचा दाखला देत राज ठाकरे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. “गोकुळ निवडणुकीत भाजप पॅनलचे १२ आणि सतेज पाटील पॅनलचे १३ संचालक लोकशाही मार्गाने बॅलेट मतदानाद्वारे निवडून आले. निकाल विरोधात जाताच सरकारने लगेच आपले ५ संचालक नियुक्त केले आणि त्यांना मतदानाचा अधिकार दिला. तुम्हाला खरोखरच लोकशाहीची चाड असती तर असा गैरप्रकार केला नसता. सत्ता मिळवता आली नाही की सर्व तत्त्वे धाब्यावर बसवायची आणि वरून लोकशाही वाचवण्याचे मोर्चे काढायचे, हा कोणता न्याय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपमध्ये समजूतदारपणाचा दुष्काळ
राज्यातील सद्यस्थितीवर बोट ठेवत राज ठाकरे म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आहे, तर दुसरीकडे भाजपमध्ये समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ जाणवत आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा काय घडू शकतात, याचेच नवल वाटते.”
‘अर्थव्यवस्था आणि देश वाचवा’साठीही मोर्चे काढतील!
भाजपच्या भूमिकेवर उपरोधिक टीका करताना ते म्हणाले, “सत्तेत राहून हे स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील आणि स्वतःच मोर्चे काढतील. यांच्या काळात दहशतवादी कारवाया वाढल्या किंवा कायदा-सुव्यवस्था ढासळली, की हेच ‘दहशतवादापासून देश वाचवा’ म्हणून रस्त्यावर उतरतील. उद्या देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली की ‘अर्थव्यवस्था वाचवा’ म्हणूनही हेच मोर्चे काढताना दिसतील.”
भाजपने रडीचा डाव बंद करावा
भाजपला थेट इशारा देत राज ठाकरे म्हणाले, “भाजपने आता रडीचा डाव खेळणे थांबवले पाहिजे. कोणत्याही मार्गाने मिळवलेले यांचे बहुमत विरोधी पक्षांनी तब्बल १२ वर्षे सहन केले. आता देशातील जनता विरोधी पक्षांकडे वळत असल्याचे दिसत असताना, भाजपनेही हा जनादेश पचवायला आणि सहन करायला शिकले पाहिजे.”










