पुणे : एसटी महामंडळाच्या बसमध्ये बसल्यावर काच सरकवून बाहेरची गार हवा खाण्याची सवय एका प्रवाशाला भलतीच महागात पडली आहे. दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या इंडिगो विमानात हवेत असताना एका बहाद्दराने चक्क “खिडकी समजून” विमानाचा आपत्कालीन दरवाजाच (इमर्जन्सी एक्झिट) उघडण्याचा प्रयत्न केला! या ‘हवाबाण’ प्रयोगामुळे विमानातल्या प्रवाशांचे प्राण कंठाशी आले होते, तर विमानाची हवा थेट पुणे विमानतळ पोलिसांच्या ठाण्यात जाऊनच निघाली.
सासवडच्या आनंद पार्क परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय गौरवने ही कमाल केली. गौरव दिल्लीहून पुण्याचा प्रवास करत होता. १९ नंबरच्या सीटवर बसलेल्या गौरवला बहुधा विमानातल्या एसीचा कंटाळा आला असावा किंवा सासवडच्या थंड हवेची आठवण झाली असावी. मग काय, विमानाने हवेत झेप घेतल्यानंतर काही वेळातच त्याने बाजूला असलेला इमर्जन्सी दरवाजा चक्क घराची अथवा एसटीची खिडकी समजून जोर लावून उघडण्याचा प्रयत्न सुरू केला!
घंटी वाजली आणि ‘हार्टबीट’ वाढले!
गौरवने दरवाजाला हात घालताच विमानातील धोक्याचे सेन्सर जोरजोरात वाजू लागले. ‘अलार्म’ वाजल्याने कॉकपिटमधील पायलटपासून ते मागे बसलेल्या प्रवाशांपर्यंत सर्वांचीच पाचावर धारण बसली. विमानात नक्की काय बिघाड झाला हे पाहण्यासाठी एअर होस्टेस आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. तिथे जाऊन बघतात तर काय, आपले सासवडचे बंधू दरवाजा उघडण्याच्या पूर्ण तयारीत!
कर्मचाऱ्यांनी अक्षरशः हात जोडून त्यांना बाजूला केले आणि “हे काय करताय?” असा जाब विचारला. त्यावर पठ्ठ्याने अत्यंत निरागसपणे उत्तर दिले, मला वाटलं ही विमानाची खिडकी आहे, थोडी हवा येईल म्हणून उघडत होतो! त्याचे हे स्पष्टीकरण ऐकून कर्मचाऱ्यांनी कपाळावर हात मारून घेतला नसता तरच नवल!
पुण्यात उतरताच थेट ‘खाकी’ पाहुणचार
मात्र विमान हवेत असताना इतर प्रवाशांचा थरकाप उडवणाऱ्या या महाशयांना पुणे विमानतळावर उतरताच मात्र चांगलाच झटका बसला. इंडिगोच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी या ‘खिडकी’प्रेमी प्रवाशाला सरळ पुणे विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळल्याबद्दल कायद्याचा रुलुक शिकवला आहे. थोडक्यात काय, तर विमानाची खिडकी ही काय एसटीची सरकती काच नव्हे, हे आता या सासवडच्या प्रवाशाला पोलीस ठाण्यात बसून नक्कीच समजले असेल!










