नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
आकाशाला भिडलेल्या किमतींमुळे भारतातील सोन्याच्या मागणीला मोठा ब्रेक लागला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशांतर्गत सोन्याची मागणी वार्षिक तुलनेत तब्बल २९ टक्क्यांनी घसरून १६२.५ टनांवर आली आहे. गेल्या सहा वर्षांतील ही सर्वात निरुत्साही तिमाही ठरली असल्याची माहिती ‘जागतिक सुवर्ण परिषदेने’ (WGC) आपल्या ताज्या अहवालात दिली आहे. अहवालानुसार, गेल्या वर्षी याच तिमाहीत (जुलै-सप्टेंबर २०२५) देशात २२९.८ टन सोन्याची खरेदी झाली होती.
यंदा वजनाच्या हिशोबाने खरेदीत मोठी घट झाली असली, तरी उच्च भावांमुळे एकूण खर्चात मात्र वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या २ लाख ३५ हजार ९० कोटी रुपयांवरून यंदा खर्च ३ टक्क्यांनी वाढून २ लाख ४१ हजार ९०० कोटी रुपयांवर पोहोचला. ग्राहकांनी प्रत्यक्ष सोने कमी खरेदी केले, तरी वाढलेल्या भावांमुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागले आहेत.
WGC च्या अंदाजानुसार, २०२६ या संपूर्ण वर्षात सोन्याची एकूण मागणी सुमारे ६५० टनांपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. करोना महामारीनंतरची ही सर्वात नीचांकी वार्षिक मागणी ठरण्याचा अंदाज आहे. सोन्याच्या वाढत्या भावांव्यतिरिक्त, परकीय चलनावरील ताण कमी करण्यासाठी नागरिकांनी सोने खरेदी टाळावी आणि इंधनाची बचत करावी, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचाही परिणाम बाजारावर झाला आहे का, याबाबत आता आर्थिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.










