पुणे : महान्यूज लाईव्ह
मनपसंत ठिकाणी बदली न झाल्याच्या रागातून पुणे पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात कार जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल भिसे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस दलात नुकत्याच पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. कॉन्स्टेबल अमोल भिसे हा पुण्यातील एका विशिष्ट पोलीस ठाण्यात बदली मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र, या फेरबदलात इच्छित ठिकाणी नियुक्ती न मिळाल्यामुळे तो प्रचंड नाराज होता.
याच रागातून त्याने थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाच्या दिशेने धाव घेत आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. घटना घडली त्यावेळी भिसे हा मद्याच्या नशेत असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सुरक्षारक्षकांनी त्याला तात्काळ रोखले असून याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.










