शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील मलठण येथे मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून वृद्ध महिलेसह कुटुंबीयांना लाकडी दांडके व कोयत्याने बेदम मारहाण करत सुमारे १ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या जबरी चोरीमुळे संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी नामदेव एकनाथ दंडवते (वय वर्षे, रा. मलठण) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात फिर्यादी यांच्या आई यमुनाबाई दंडवते या गंभीर जखमी झाल्या असून वडील एकनाथ दंडवते आणि चुलती लहानुबाई दंडवते यांनाही चोरट्यांनी मारहाण केली आहे.
दरवाजा उघडताच हल्ला
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादी यांचे आई-वडील आणि चुलती घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या दरवाजाच्या कडीचा आवाज झाला. काहीतरी वाजल्याची शंका आल्याने यमुनाबाई यांनी दरवाजा उघडला असता, दबा धरून बसलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी अचानक घरात घुसखोरी केली, तर त्यांचा एक साथीदार घराच्या ओट्यावर पाळत ठेवून उभा राहिला.
घरात शिरलेल्या एका चोरट्याने हातातील लाकडी दांडक्याने झोपेत असलेल्या तिघांनाही बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या आरोपीने हातातील कोयत्याच्या मुठीने यमुनाबाई यांच्या उजव्या हातावर वार केले. याच दरम्यान तिसऱ्या चोरट्याने यमुनाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून काढले. दागिने खेचल्यामुळे त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
१ लाख २८ हजारांचा मुद्देमाल लंपास
या जबरी चोरीत दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फूल असा एकूण १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमींवर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. सणासुदीच्या काळात ग्रामीण भागात वाढलेल्या या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर या चोरांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.










