शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथील एका नामांकित कंपनीतून तब्बल ५ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक सर्व्हे मशिन लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हा करून परराज्यात पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढत शिक्रापूर पोलिसांनी थेट हरियाणामध्ये धडक कारवाई केली, तर दुसऱ्या साथीदाराला पुण्यातून बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
कंपनीतून ५ लाखांचे सर्व्हे मशिन लंपास
डिंग्रजवाडी परिसरातील ‘इगवुड प्रा. लि. स्कॅलार स्पेसेस’ या कंपनीतून जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणारे ५ लाख रुपयांचे महागडे सर्व्हे मशिन अज्ञात चोरट्यांनी शिताफीने चोरून नेले होते. या प्रकरणी संग्राम शामराव मोरे (वय ४४, रा. चिखली प्राधिकरण, चिंचवड, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३४(१), ३०५, ३१७(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तांत्रिक विश्लेषण अन् हरियाणातून आरोपी जेरबंद
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासी अधिकारी पोलीस हवालदार अजित इंगवले व गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. घटनास्थळावरील पुरावे, सायबर विभागाचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.
चोरी केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपींनी थेट राज्य बदलले होते. मात्र, शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने माग काढत हरी किशन जाटो (वय २४, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) याला थेट हरियाणा राज्यातून शिताफीने ताब्यात घेतले. तर त्याचा साथीदार अफाकजुद्दीन मुंताजिमुद्दीन काझी (वय ३६, रा. खडकी) याला विश्रांतवाडी (पुणे) येथून सापळा रचून अटक केली.
गुन्ह्याची कबुली; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या साहित्यापैकी ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या आरोपींनी अशाच प्रकारे इतर भागांत किंवा कंपन्यांमध्ये हातसफाई केली आहे का, यादृष्टीने पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही धडक कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार अजित इंगवले, रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, गणेश कुदळे, तसेच पोलीस अंमलदार नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे, भारत भोसले, ललित चकनारायण आणि मयूर कुंभार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अजित इंगवले करत आहेत.










