बारामती : बारामती तालुक्यात गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले असून, आता चोरट्यांनी थेट देवस्थानांना आपले लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील कटफळ येथील प्रसिद्ध जानाई देवीच्या मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून चोरांनी तब्बल १२ लाख रुपये किमतीचे ६ किलोहून अधिक वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले. या थरारक चोरीच्या घटनेमुळे तालुकाभरात खळबळ उडाली आहे.
मध्यरात्री २ वाजता रेकी करून धाडसी डल्ला
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक अंदाजानुसार, ही घटना मध्यरात्री साधारण २:०० च्या सुमारास घडली. चोरट्यांनी आधी मंदिराची रेकी केल्याचा संशय आहे. मध्यरात्रीच्या सुमारास संपूर्ण गाव गाढ झोपेत असताना चोरट्यांनी मंदिराच्या दिशेने मोर्चा वळवला. मंदिराचे मुख्य कुलूप व कडी-कोयंडा शिताफीने तोडून चोरांनी थेट मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. कोणत्याही प्रकारची चाहूल लागू न देता चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचा मुकूट, कंठी आणि प्रभावळीसह अंगावरील सर्व मौल्यवान दागिने अक्षरशः ओरबाडून काढले आणि अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.
पहाटे पुजारी आले अन् चोरी उघडकीस आली
दररोजच्या नियमाप्रमाणे पहाटे मंदिराचे पुजारी आप्पा गुरव हे पूजा आणि आरतीसाठी मंदिरात पोहोचले. त्या वेळी मंदिराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी तातडीने आत धाव घेतली असता गाभाऱ्यातील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. देवीच्या अंगावरील सर्व मौल्यवान चांदीचे दागिने गायब होते आणि साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. पुजारी गुरव यांनी तत्काळ ग्रामस्थांना व पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
गावात संतापाची लाट; चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची नाकाबंदी
घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेत पंचनामा सुरू केला. ठसेतज्ज्ञ (Fingerprint Experts) आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे. मंदिराच्या आजूबाजूला व मुख्य रस्त्यांवर बसवलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले जात असून, मध्यरात्रीच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात अशा प्रकारे धाडसी चोरी झाल्याने ग्रामस्थ आणि भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तात्काळ परिसराची नाकेबंदी केली असून संशयितांचा माग काढण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.










