दौंड : बालकुमार मराठी साहित्य संमेलनांतर्गत आयोजित दौंड तालुकास्तरीय विद्यार्थी स्पर्धेत हातवळण (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेच्या तीन विद्यार्थिनींनी विविध गटांत बाजी मारत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
वरवंड येथील नागनाथ विद्यालयात या तालुकास्तरीय स्पर्धा पार पडल्या. यामध्ये हस्ताक्षर स्पर्धेत ऋतुजा रमेश शिंदे हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. तर कथालेखन स्पर्धेत आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर आराध्या दादा शिंदे हिने द्वितीय क्रमांक, तसेच हस्ताक्षर स्पर्धेत गौरी राजाराम माने हिने तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थिनींच्या या यशात ‘अक्षरछंद’ टीमच्या कार्यशाळांचा मोठा वाटा राहिला. अक्षरांची योग्य रचना, वळण, आकारमान आणि लेखनातील शिस्त यावर आधारित घेतलेल्या विशेष कार्यशाळांमुळे विद्यार्थिनींचे हस्ताक्षर सुधारण्यास मोठी मदत झाली.
या यशाबद्दल मुख्याध्यापक बाळासाहेब आढागळे, शिक्षक महादेव भालेराव, दिलीप साळुंके, छाया साळुंके, अक्षय गवळी, रावसाहेब घोरपडे तसेच ‘अक्षरछंद’ टीमचे पांडुरंग जाधव, मिलिंद टेंगले, कैलास थोरात आणि सुभाष फासगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले. हातवळण परिसरातून या तिन्ही विद्यार्थिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जिल्हास्तरीय स्पर्धेत ऋतुजा शिंदे हिच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










