दौंड : महान्यूज लाईव्ह
शहरासह ग्रामीण भागातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दौंड पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दौंड शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर अचानक छापे टाकून १२ जणांना ताब्यात घेतले. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २१ हजार ३५० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
पहिली कारवाई: घंटाचाळ परिसरात तिरट जुगारावर छापा; ६ जण ताब्यात
घंटाचाळ परिसरातील एका खोलीत ‘तिरट’ नावाचा पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथकासह छापा टाकला असता, त्याठिकाणी सहा जण जुगार खेळताना आणि चालवताना रंगेहात सापडले. विकी रामदास भालेराव (वय ३२), स्टॅनली जोसेफ त्रिभुवन (वय ४८), अजय मुरलीधर उबाळे (वय ४५), अतुल सुभाष कांबळे (वय ३७), अविनाश लक्ष्मण लष्करे (वय ४०) आणि राजा अशोक जगदाळे (वय ३६) अशी त्यांची नावे आहेत.
आरोपींकडून रोख रक्कम आणि ५२ पानांचे दोन पत्त्यांचे कॅट असा एकूण १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अजय उबाळे व विजय तेलोरे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा अड्डा सुरू केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दुसरी कारवाई: लोखंडे वस्तीतील पत्रा शेडमध्ये कारवाई; आणखी ६ जणांवर गुन्हा
दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी लोखंडे वस्ती परिसरातील एका लोखंडी पत्रा शेडमध्ये छापा टाकला. तेथे तीन पानी तिरट जुगार खेळत व खेळवत असताना सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये रवी नाना घाडगे (वय ३७), मिलिंद भिवाजी उजागरे (वय ४२), संदीप ज्ञानदेव लोखंडे (वय ४७), ईसाक बाबानिया सय्यद (वय ४६), सुशिल पिटर हारगुडे (वय ३५), योसेफ मिशक खांट (वय ५०) आणि वैभव बाळू लोखंडे (वय ३५) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत आरोपींकडून १० हजार ५५० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
या दोन्ही घटनांप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. अवैध धंदे चालवणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.










