कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात रुग्णांना मोठा दिलासा: तब्बल ३९७ औषधांच्या किमतीत घसघशीत कपात; सॅमटेपाचे दर थेट ८० हजारांवरून ७ हजारांवर
विशेष वृत्त
कर्करोगासारख्या गंभीर आणि दुर्धर आजाराशी लढा देणाऱ्या लाखो रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार कर्करोगाच्या ३९७ म्हणजेच तब्बल ७३ टक्के औषधांच्या किमतींमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. कर्करोगाचे उपचार आणि विशेषतः केमोथेरपीची औषधे अवाजवी नफेखोरीमुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती.
या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याबाबत विचारणा केल्यानंतर केंद्र सरकारने १३७ नॉन-शेड्यूल्ड कर्करोगविरोधी औषधांवरील व्यापारी नफा (ट्रेड मार्जिन) ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे निर्देश दिले. या दणक्यानंतर औषध कंपन्यांनी नवीन सुधारित दर जाहीर केले असून येत्या दोन आठवड्यांत ही सर्व औषधे रुग्णांना अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.
या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा केमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी घेणाऱ्या रुग्णांना मिळणार आहे. प्राधिकरणाच्या माहितीनुसार, २१७ औषधांच्या किमती निम्म्याहून अधिक कमी करण्यात आल्या आहेत, तर ९७ ब्रँड्सवर ७० टक्क्यांहून अधिक आणि ५० ब्रँड्सवर ८० टक्क्यांपेक्षा जास्त कपात लागू झाली आहे. विशेष म्हणजे पाच अत्यावश्यक औषधांचे दर तर तब्बल ९० टक्क्यांनी घसरले आहेत. सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घसरण सॅमटेपा किंवा थिओटेपा या केमोथेरपी इंजेक्शनमध्ये पाहायला मिळाली असून, ज्या इंजेक्शनसाठी रुग्णांना पूर्वी तब्बल ८०,०७१ रुपये मोजावे लागत होते, तेच इंजेक्शन आता अवघ्या ७,१५० रुपयांना मिळणार आहे.
स्तन कर्करोगाच्या उपचारात अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे पाल्बोप्रो (पॅल्बोसायक्लिब) या २१ कॅप्सूलच्या पॅकची किंमत ४०,४२१ रुपयांवरून थेट २,७२० रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे प्रोस्टेट कर्करोगावरील एबिरालाईव्ह टॅब्लेट २८,००० रुपयांवरून ४,८४० रुपयांवर, तर फुफ्फुस, किडनी व पोटाच्या कर्करोगासाठी उपयुक्त असलेले इवुझुमॅब (४०० मिग्रॅ) इंजेक्शन ६९,८५२ रुपयांवरून १३,५१२ रुपयांवर आणण्यात आले आहे. वोमाझोल गोळ्यांच्या पाकिटाची किंमत ४५८ रुपयांवरून थेट ३९ रुपयांवर आल्याने मध्यमवर्गीय व गरीब रुग्णांवरील उपचारांचा प्रचंड आर्थिक बोजा लक्षणीयरीत्या हलका होणार आहे.
मात्र, या दिलाशासोबतच रुग्णांनी एका महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या सुधारणेनंतरही बाजारातील १४६ ब्रँडेड औषधांच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. २१ हून अधिक प्रकारच्या कर्करोगांवर वापरले जाणारे कीट्रुडा हे प्रगत इम्युनोथेरपी औषध आजही २,१६,५०० रुपयांनाच मिळत आहे. याशिवाय रिबोसायक्लिब (२४,४३५ रुपये), टॅग्रिसो, टेसेंट्रिक, डार्झालेक्स आणि इम्फिन्झी यांसारख्या अतिमहागड्या औषधांचे दर अद्यापही स्थिर आहेत.
त्यामुळे रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे खरेदी करताना सुधारित एमआरपीची खात्री करावी, तसेच औषधांमधील मूळ घटकांनुसार (मॉलिक्यूल) कमी दरात उपलब्ध असलेल्या पर्यायी ब्रँड्सबाबत आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून केले जात आहे.










