शिरूर : गावात विठू नामाचा गजर सुरू होता, टाळ-मृदंगाच्या तालावर सगळेच भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. आजी आपल्या लाडक्या नातवंडांना घेऊन देवाच्या दारी कीर्तनाचे श्रवण करायला गेली होती. देवदर्शनाने तृप्त झालेली मने घेऊन ते घराच्या दिशेने निघाले खरे, पण नियतीच्या मनात काहीतरी भलतेच क्रूर सुरू होते. वाटेत एका भरधाव अज्ञात वाहनाने घात केला आणि क्षणात हसत्याखेळत्या संसाराची राखरांगोळी झाली.
शिरूर तालुक्यातील आंबळे गावात घडलेल्या या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातात आजीसह तिच्या दोन निष्पाप नातवंडांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शिरूर तालुक्यासह पंचक्रोशीतील डोळे पाणावले आहेत. कौशल्या वसंत झेंडे (वय ६१), आरुषी दत्तात्रय झेंडे (वय ११) आणि सोहम राजीव झेंडे (वय १३) अशी या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
आंबळे गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिभावाच्या या वातावरणात कीर्तन ऐकण्यासाठी कौशल्या झेंडे या आपल्या कुटुंबासह मोठ्या आनंदाने गेल्या होत्या. कीर्तनातील हरिनामाचा प्रसाद मनात साठवून घरी परतत असताना, अंधारातून आलेल्या एका निष्काळजी, बेदरकार वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, काही क्षणांपूर्वी आनंदाने आजीचा हात धरून चालणारी ती निष्पाप फुले रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली.
अपघाताचा भीषण आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निष्पापांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्या तिघांचीही प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. ज्या वयात स्वप्ने पाहायची, आभाळ कवेत घ्यायचे, त्या वयात सोहम आणि आरुषी या चिमुकल्यांचा असा निर्दयी अंत व्हावा, हे पाहून उपस्थितांचा कंठ दाटून आला होता. या भीषण धडकेत ज्योती राजीव झेंडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ज्या घरामध्ये काही तासांपूर्वी बालकांचा किलबिलाट होता, तिथे आता केवळ आक्रोश आणि शांतता उरली आहे. कीर्तनाला जाऊन विठू चरणी लीन झालेले हे निष्पाप जीव कायमचे देवाघरी निघून गेले, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांपैकी आजी आणि दोन कोवळ्या कळ्या अशा क्रूरपणे एका क्षणात हिरावल्या गेल्याने झेंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण आंबळे गावातील चुली आज पेटल्या नाहीत. निष्पापांचा जीव घेणाऱ्या त्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आर्त हाक आता ग्रामस्थांमधून दिली जात आहे.










