बारामती : राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि बारामती तालुका पोलिसांनी संयुक्त धडक मोहीम राबवत बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनगाव, मेखळी आणि वाघळवाडी परिसरातील अवैध गावठी हातभट्टी अड्ड्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ८ अड्ड्यांवर छापे टाकून सुमारे २ लाख १८ हजार ८०० रुपयांचे कच्चे रसायन व तयार दारू जागीच नष्ट करण्यात आली असून ७ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर एक आरोपी फरार झाला आहे.
गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई करण्यात आली. पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात घटनास्थळावरून ११० लिटर तयार गावठी दारू आणि ५ हजार १८० लिटर कच्चे रसायन जप्त केले. हे सर्व रसायन व दारू पोलिसांनी जागीच नष्ट केली, तसेच भट्टीचे साहित्य व इतर मुद्देमाल ताब्यात घेतला. या अवैध धंद्यासाठी कच्चा माल पुरवणारे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि स्थानिक पातळीवर कोणाचा सहभाग आहे, याचा कसून शोध उत्पादन शुल्क विभागाकडून घेतला जात आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहसंचालक (कायदा व सुव्यवस्था), विभागीय आयुक्त, पुणे अधीक्षक अतुल कानडे व हडपसर विभागाचे उपअधीक्षक गणेश कसरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती, दौंड, सासवड, एच विभाग, भरारी पथक-२ (पुणे) तसेच बारामती तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एम. साबळे (बीट क्र. १), एम. पी. होलम (बीट क्र. २) आणि गिरीशकुमार करचे (बीट क्र. ३) करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील फुगेवाडी परिसरात नुकत्याच घडलेल्या विषारी दारूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, परिसरात कुठेही अवैध हातभट्टी दारू तयार होत असल्यास किंवा विक्री सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.










