सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील निंबूत येथील खंडोबाचीवाडी लगत असलेल्या घुमट वस्ती परिसरात आज (दि. २७) दुपारी उसाच्या शेताला लागलेल्या भीषण आगीत सुमारे २० एकरांवरील उभा ऊस जळून खाक झाला. विजेच्या तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून, ऐन तोडणीच्या तोंडावर उसाचे फड डोळ्यादेखत भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
दुपारच्या सुमारास घुमट वस्ती परिसरातील उसाच्या शेतातून अचानक धुराचे लोट उठू लागले. उसाची वाढ दाट असल्याने आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने काही मिनिटांतच रौद्र रूप धारण केले. स्थानिक शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र आगीच्या तीव्र ज्वाळांमुळे ती नियंत्रणात आणणे अशक्य झाले. पाहता पाहता आगीने लगतच्या शेतांना वेढले आणि २० एकरांवरील पीक जळून कोळसा झाले.
गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची टंचाई आणि प्रतिकूल हवामानाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर कसाबसा ऊस जगवला होता. तोडणीला आलेले आणि कष्टाने वाढवलेले पीक काही क्षणांत नष्ट झाल्याने बाधित शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महावितरणच्या लोंबकळणाऱ्या आणि निष्काळजीपणे सोडलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे उडालेल्या ठिणग्यांनी ही आग लागल्याचा थेट आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने आणि महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जळालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करावेत, तसेच हवालदिल झालेल्या बाधित शेतकऱ्यांना महावितरण व शासनाकडून तातडीने भरपाई मिळवून द्यावी, अशी संतप्त मागणी परिसरातून होत आहे.










