बारामती : शहरातील वर्दळीच्या पेन्सिल चौकात काल रात्री दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी आणि दंगा झाल्याची घटना घडली. भर चौकात गोंधळ घालत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या या दोन्ही गटांपैकी कोणीही एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. मात्र, कायद्याचा धाक दाखवत बारामती तालुका पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत या प्रकरणातील तब्बल १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास बारामतीतील पेन्सिल चौक परिसरात काही लोकांमध्ये वाद सुरू होऊन त्याचे पर्यावसन मोठ्या हाणामारीत झाले. काही इसम रस्त्यावरच एकमेकांशी भिडल्याने चौकात नागरिकांची मोठी धावपळ उडाली व भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शहारुख शकिल शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस हवालदार खारतोडे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल कदम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत वाद घालणाऱ्यांना ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली, मात्र दोन्ही बाजूंनी कोणीही अधिकृत फिर्याद देण्यास तयार नव्हते. अखेर सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार शहारुख शेख यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी होत १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांची नावे पुढीलप्रमाणे, १) गणेश शरद आटोळे, २) विनोद विठ्ठल आटोळे, ३) अनिकेत प्रमोद बेंगारे, ४) विकास अशोक आटोळे, ५) तुषार बंडू आटोळे, ६) आदेश ज्योतीराम आटोळे, ७) धनाजी संपत आटोळे, ८) स्वप्निल शिवलाल आटोळे, ९) अभिमान अंबुदास लांडगे, १०) समाधान शशिकांत भिसे, ११) सुशांत बाळू मोहिते, १२) प्रितम अंकुश कुचेकर, १३) मनोज सुहास बागाव, १४) निखील शिवलाल आटोळे, १५) सोहम राजू लोंढे १६) आदित्य अतुल भिसे (सर्व रा. सावळ, ता. बारामती, जि. पुणे)
या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४ (२) (सार्वजनिक शांततेचा भंग / दंगा) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार टिळेकर यांनी केली असून, पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रदीप काळे पुढील तपास करत आहेत.










