राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील शिवतारा उद्योग समूहाचे उद्योजक सुपुत्र विक्रांत सुभाषराव गायकवाड यांनी नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करीत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आणि भगवा स्वराज्य ध्वज फडकवून नवा ऐतिहासिक विक्रम केला आहे. त्यांच्या या कामगिरीने दौंडच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचे नाव जगाच्या शिखरावर पोहोचले आहे.
अतिशय खडतर आणि जीवघेण्या हवामानात त्यांनी मिळवलेले हे यश आजच्या तरुण पिढीसाठी मोठी प्रेरणा आणि दिशा देणारे ठरणार आहे. माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पला आजवर अनेक ट्रेकर्स आणि गिर्यारोहक गेले आहेत; परंतु या सर्वोच्च शिखराच्या सानिध्यात आपला ‘स्वराज्य ध्वज’ फडकवण्याचा हा पहिलाच प्रसंग मानला जात आहे.
बेस कॅम्प हे समुद्रसपाटीपासून ५,३६४ मीटर (जवळपास १८,००० फूट) उंचीवर आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी माणसाची शारीरिक आणि मानसिक कसोटी लागते. बेस कॅम्पवर तापमान उणे २२ (-२२) अंश सेल्सिअस इतके खाली जाते आणि ऑक्सिजनची पातळी केवळ ४५ टक्के इतकीच असते. अशा अतिथंड आणि प्राणवायूच्या कमतरतेच्या परिस्थितीत विक्रांत गायकवाड यांनी हा टप्पा गाठला.
हिमालयाच्या पर्वत रांगांमधील हा प्रवास अत्यंत खडतर, चढ-उतारांचा आणि दमछाक करणारा असतो. विक्रांत यांनी हा प्रवास अवघ्या ६ दिवसांत, ६५ किलोमीटर पायी चालून केवळ ३७ तासांच्या अॅक्टिव्ह ट्रेकिंगमध्ये पूर्ण करत आपला संकल्प तडीस नेला. विक्रांत गायकवाड हे ‘शिवतारा उद्योग समूहा’चे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या वडिलांपासूनच गायकवाड परिवाराने समाजात मोठी सामाजिक बांधिलकी जपली आहे. व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी स्वतःच्या फिटनेसलाही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
याचाच पुरावा म्हणजे, त्यांनी २०२२, २०२३ आणि २०२४ या सलग तीन वर्षांत जगभरात अतिशय कठीण मानली जाणारी ‘आयर्नमॅन ७०.३’ ही मानाची स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यांच्या याच सातत्यपूर्ण तंदुरुस्तीचा फायदा त्यांना या एव्हरेस्ट मोहिमेत झाला. त्यांच्या या मोहिमेमागे एक मोठा सामाजिक आणि वैचारिक हेतू आहे. हा प्रेरणादायी संदेश जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचावा आणि आजच्या तरुणाईने यातून प्रेरणा घेऊन फिटनेस तसेच साहसी खेळांकडे वळावे, अशी त्यांची इच्छा आहे. भविष्यात अनेक तरुण असे उत्तुंग संकल्प करून जगभरात ‘स्वराज्य ध्वज’ अभिमानाने फडकवतील, हीच या मोहिमेची फलश्रुती असेल.










