२३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
बारामती : पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक सशस्त्र हल्ल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींना गजाआड केले आहे. या हल्ल्यासाठी तब्बल २ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात उघड झाले असून मुख्य सूत्रधारासह हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७:१० वाजण्याच्या सुमारास पालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर दोन अज्ञात मुलांनी प्राणघातक सशस्त्र हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०९(१), ११८(१), ११८(२), ११५(२), ३(५) सह आर्म ॲक्ट कलम ३, ४, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पुणे शहर पोलिसांच्या मदतीने आरोपी ताब्यात
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पुणे शहर पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह पार्थ वासुदेव अवथळे (वय १९ वर्ष, मूळ रा. पिंपरी गवरी, ता. खामगाव, जि. बुलढाणा; सध्या रा. कर्वेनगर, दत्तमंदिर कॅनॉल रोड, स्पेन्सर चौक, पुणे) याला पकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.
२ लाखांची दिली होती सुपारी
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५० वर्षे, धंदा- चालक व मॅनेजमेंट; मूळ रा. वीट, ता. करमाळा, जि. सोलापूर; सध्या रा. स्वामी समर्थ समोरील साई लिला बिल्डींग, थोरातनगर, भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) याने राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी आरोपींना २ लाख रुपये दिल्याचे निष्पन्न झाले.
२३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी पार्थ वासुदेव अवथळे आणि ज्ञानदेव महादेव शिंदे या दोघांना २० ऑक्टोबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या हल्ल्यामागचा मूळ हेतू काय होता आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार करत आहेत.










