पुणे : महान्यूज लाईव्ह
विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दैनिक ‘पुढारी’ वृत्तसमूहाचे चेअरमन योगेश जाधव यांना एक जाहीर खुले पत्र लिहून थेट शेलक्या शब्दांत जाब विचारला आहे. वृत्तपत्राने पत्रकारितेचा उघड बाजार मांडला असून ‘पॅकेज संस्कृती’ आणि ‘पेड न्यूज’च्या माध्यमातून सर्वसामान्य उमेदवारांचा आवाज दाबला जात असल्याचा खळबळजनक आरोप धंगेकर यांनी केला आहे.
या पत्रात धंगेकर यांनी अत्यंत आक्रमक भाषेचा वापर करत योगेश जाधव यांच्यावर एकामागून एक बोचरे वार केले आहेत. निवडणुकीच्या काळात त्यांचे हस्तक ‘सुपारी बहाद्दर’ आणि ‘सांड दलाल’ बनून उघडपणे बाजारात फिरतात आणि उमेदवारांचे खिसे कापून स्वतःचे तसेच व्यवस्थापनाचे खिसे गरमागरम करतात, असा घणाघात त्यांनी केला. आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला म्हणजे पत्नीला निवडणुकीत उतरवून संपूर्ण माध्यम समूहाची विश्वासार्हता पणाला लावली गेली आहे, असा थेट आक्षेपही त्यांनी नोंदवला आहे.
सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप करताना धंगेकरांनी उधारी व वसुलीचा मुद्दा उकरून काढला आहे. त्यांनी विचारणा केली आहे की, ‘वसुलीपँटर पांड्या’ या हस्तकाने कोट्यवधींच्या सुपार्या घेतल्या असून, त्याने वसुली करून आणलेले अडीच कोटी रुपये योगेश जाधव यांना येणे बाकी आहेत, म्हणूनच त्याचे हवे तसे चोचले पुरवले जात आहेत का? तसेच मतदानाच्या दोन दिवस आधी खोट्या बातम्या छापणारे हस्तक आणि त्यांची सुपारीबाजी आम्ही उघडी पाडल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी भरला आहे.
सुशिक्षित आणि पदवीधर मतदारांना पैशाच्या जोरावर लाचार व विकत घेण्यासारखे समजू नका, असा इशारा देत धंगेकर यांनी शेवटी असा टोला लगावला आहे की, जर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा वापर स्वतःच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक प्रगतीसाठीच करायचा असेल, तर तुमची जागा विधान परिषदेत नसून व्यापारपेठेत आहे. हा मतदारवर्ग मतपेटीच्या माध्यमातून योग्य जागा दाखवून देईल, असे सांगत धंगेकरांनी या पत्राद्वारे संपूर्ण माध्यम वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.










