बारामती : पुणे जिल्हा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी बारामती न्यायालय आणि बारामती वकील संघटनेला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या दौऱ्यामुळे बारामती न्यायालयातील प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्यासह न्यायालयीन पायाभूत सुविधा आणि वकील वर्गाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे.
या भेटीदरम्यान मुख्य न्यायाधीश शेंडे यांनी न्यायालयीन स्तरावरील प्रलंबित प्रशासकीय कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी स्थानिक न्यायाधीशांसोबत विशेष बैठक घेतली. दैनंदिन कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक व्हावे यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यासोबतच बारामती न्यायालयाच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी चर्चा केली. इमारतीचे काम जलद गतीने पूर्ण करून ती तातडीने पक्षकार व नागरिकांच्या सेवेसाठी खुली करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
यानंतर आयोजित बैठकीत त्यांनी बारामती वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सचिन वाघ व कार्यकारिणीने त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी वकील बांधवांसाठी आवश्यक असणाऱ्या लॉयर्स हॉलला मंजुरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला; तसेच वकील कक्षातील फर्निचर आणि इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.
‘बार आणि बेंच’मधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करताना अंजू शेंडे यांनी, सर्वसामान्य जनतेला वेळेत व सुलभ न्याय मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्थेतील सर्व घटकांनी सक्षमपणे एकत्र काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवणे व वृद्धिंगत करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी बारामती जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. व्ही. सी. बर्डे, जिल्हा न्यायाधीश श्री. हितेंद्र वाणी, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सचिन वाघ, उपाध्यक्ष ॲड. राज मासाळ, सचिव ॲड. स्नेहा मखरे, सहसचिव ॲड. आकाश घारे, महिला प्रतिनिधी ॲड. भाग्यश्री वाघमारे, खजिनदार ॲड. हर्षद तिकोटे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी आणि बारामती वकील संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.










