बारामती : विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर बारामती तालुक्यातील छायाचित्रकारांची नवी संघटनात्मक ताकद उभी राहिली असून, ‘बारामती तालुका फोटोग्राफर असोसिएशन’ची अधिकृत घोषणा करण्यात आली. संघटनेचे प्रेरणास्थान स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक होऊन, पुष्प अर्पण करत तालुक्यातील छायाचित्रकारांनी आपल्या सामाजिक व व्यावसायिक कार्याचा श्रीगणेशा केला.
यावेळी उपस्थित सर्व छायाचित्रकार बंधू-भगिनींनी एकत्र येत व्यावसायिक हित आणि न्याय्य हक्कांसाठी सदैव एकसंध राहण्याची सामूहिक शपथ घेतली. शहरासह ग्रामीण भागातील सर्व ज्येष्ठ आणि युवा छायाचित्रकारांना एका छताखाली आणण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. स्मृतिस्थळावर झालेल्या या मेळाव्यात बोलताना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अजितदादांची कार्यशैली आणि विकासाची दृष्टी हीच संघटनेसाठी निरंतर प्रेरणादायी ठरेल. तालुक्यातील एकाही छायाचित्रकारावर अन्याय होऊ न देणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हाच या संघटनेचा मुख्य उद्देश आहे.
या सोहळ्यात संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी विशाल साळुंखे, उपाध्यक्षपदी प्रशांत कुचेकर व महेश रोकडे, सचिवपदी संतोष चौधरी, खजिनदारपदी बाळासाहेब कारंडे, कार्याध्यक्षपदी सागर सूळ यांची निवड झाली, तर सल्लागार म्हणून सचिन सावंत व तृणाल गायकवाड जबाबदारी सांभाळणार आहेत. याशिवाय कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून गौरव होले, स्वप्नील शिंदे, प्रीतम कुंभार, महेंद्र जगदाळे आणि अक्षय शेळके यांचा समावेश आहे.
या ऐतिहासिक प्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर शिंदे, योगेश दुर्गे, अतुल चव्हाण, अजित स्वामी यांच्यासह तालुक्यातील खेडोपाड्यांतून आलेले छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीमोल्लंघनाच्या शुभदिनी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेल्याने तालुक्यातील छायाचित्रकार वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.










