बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका; वाहनमालकांवर भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहर व तालुका परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध बारामती विभाग पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. १७ ऑक्टोबर रोजी राबवलेल्या या विशेष मोहिमेत एकूण सात गुन्हे दाखल करून संबंधित सातही वाहने जप्त करण्यात आली आहेत.
सार्वजनिक रस्त्यांवर मनमानी पद्धतीने वाहने उभी केल्यामुळे पादचारी आणि इतर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचा वेळ वाया जातो. या समस्येची गंभीर दखल घेत बारामती विभाग पोलिसांनी ही कारवाई हाती घेतली.
या मोहिमेदरम्यान बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५, तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ अशा एकूण ७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. पोलिसांनी अडथळा ठरणारी ही वाहने तात्काळ जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. संबंधित वाहनमालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास पूर्ण करून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सार्वजनिक रस्ते सर्वांच्या वापरासाठी असून नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर न लावता केवळ अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच उभी करावीत. नियम मोडणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा बारामती विभाग पोलिसांनी दिला आहे.










