सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास करणारा आरोपी जेरबंद; दोन साथीदार फरार, पोलिसांकडून कसून शोध सुरू.
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथे एकाच रात्री तब्बल पाच घरांचे कुलूप तोडून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा घरफोड्यांच्या टोळीला शिक्रापूर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. या धाडसी घरफोडी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत ही कारवाई करत टोळीचा पर्दाफाश केला. अनिल निदान भोसले (वय ४४ वर्षे, रा. थोरला मळा, मोराची चिंचोली, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुडे गावात चोरट्यांनी एकाच रात्री पाच घरांना लक्ष्य केले होते.
घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करून चोरटे पसार झाले होते. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी विठ्ठल दत्तात्रय डांगे (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५(अ) आणि ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकाच वेळी पाच ठिकाणी झालेल्या घरफोडीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तातडीने तपास पथके रवाना केली. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित अनिल भोसले याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दोन साथीदारांच्या मदतीने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अधिकृतरीत्या अटक केली.
या गुन्ह्यातील इतर दोन फरार साथीदार नेमके कुठे लपले आहेत, याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच या टोळीने परिसरात अशा प्रकारच्या आणखी किती चोऱ्या केल्या आहेत, याचा सखोल तपास सुरू असून लवकरच मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही धडक कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (शिरूर विभाग) रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, संदिप बनकर, पोलीस अंमलदार नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे आणि भारत भोसले यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदिप बनकर करत आहेत.










