बारामती, महान्युज लाईव्ह
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बारामती येथील मे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि. १६ ऑक्टोंबर २०२६ रोजी हा निकाल दिला.
न्यायालयाने आरोपीस बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पॉक्सो) कलम ३, ५ (एन), ६ अन्वये सश्रम कारावासाची जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच पॉक्सो कलम ३, ४ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, कलम ७, ८ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, आणि कलम ११, १२ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावला. तसेच पीडितेला ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
सदरचा गुन्हा हा पीडितेच्या वडिलाविरुद्ध दाखल करण्यात आला होता. सन २०२२ मध्ये आरोपी व पीडिता हे विटभट्टीवर राहण्यासाठी आले होते. त्यावेळी २७ डिसेंबर २०२२ पासून आरोपीने पीडितेवर ७ ते ८ वेळा अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या अत्याचारामुळे पीडिता गरोदर राहिली. आरोपीने सदरची गोष्ट बाहेर कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने ही बाब सांगितल्यानंतर आरोपी तिला एकटीला विटभट्टीवर सोडून निघून गेला होता.
त्यानंतर विटभट्टी मालकाच्या पत्नीने पीडितेकडून तिच्या आजीचा व मामाचा फोन नंबर मिळवून त्यांना सदर बाब फोनवरून सांगितली. त्यानंतर तिला शासकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत स्वतः पीडितेने दौंड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती.
सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक ए. बी. गटकुळ यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील स्नेहल कालीदास नाईक यांनी काम पाहिले. त्यांनी सदर केसमध्ये एकूण १२ साक्षीदार तपासले. पीडित मुलीने आरोपीने तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराची घटना न्यायालयात सांगितली.
सदरील प्रकरणात पीडित मुलीची साक्ष ही विश्वसनीय असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष त्यास पुष्टी देत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील स्नेहल कालीदास नाईक यांनी केला होता. तो ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सदर प्रकरणी पैरवी अधिकारी जी. के. कस्पटे तसेच दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मनिषा अहिवळे यांनी सरकारी वकिलांना सहकार्य केले.











