शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर शहरातील रामलिंग रोडवरील आनंद सोसायटीत आज पहाटेच्या सुमारास घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याने केलेल्या गोळीबारात व्यापारी गंभीर जखमी झाले. वडिलांना वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या १२ वर्षांच्या मुलीवरही चोरट्याने हल्ला करत तिला जखमी केले. या धक्कादायक घटनेमुळे शिरूर शहर आणि परिसरात तीव्र खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
आनंद सोसायटीमध्ये पहाटेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. हालचाल जाणवल्याने व्यापारी उमेश छाजेड (वय ४५) आणि कुटुंबीय जागे झाले. चोरट्याला रंगेहात पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने थेट गोळीबार केला. या गोळीबारात छाजेड हे गंभीर जखमी झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून वडिलांच्या मदतीला धावलेली त्यांची १२ वर्षांची मुलगी मानवी हिने चोरट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरट्याने तिच्यावरही जबर हल्ला चढवला.
या झटापटीत तिच्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेनंतर चोरटा तिथून पसार होण्यात यशस्वी झाला. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरवस्तीत आणि उच्चभ्रू सोसायटीत अशा प्रकारे घरात घुसून गोळीबार झाल्याने शिरूरमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शिरूरमध्ये गुन्हेगारांचा वाढता उपद्रव; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
गेल्या काही महिन्यांपासून शिरूर शहर व लगतच्या भागात गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली असून, यापूर्वी झालेल्या घटनांमध्ये काहींना जीवही गमवावा लागला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा गंभीर गुन्ह्यांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात तात्काळ रात्रगस्त वाढवावी आणि आरोपीला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.










