वाढदिवसानिमित्त काटेवाडीत कीर्तन सोहळ्याचे आयोजन; हार-तुरे, पुष्पगुच्छ न स्वीकारता सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार
बारामती : राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा कोणताही अनावश्यक व उत्सवी खर्च टाळून दुष्काळग्रस्तांच्या मदतीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी केले आहे.
शुभेच्छा केवळ सत्कारातून नव्हे, तर प्रत्यक्ष सेवाकार्यातून व्यक्त कराव्यात, असा संदेश त्यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा वाढदिवस रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी आहे. या निमित्ताने त्यांची कर्मभूमी असलेल्या काटेवाडी येथे रविवारी सायंकाळी ६:३० वाजता कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हभ.प. अभिमन्यू कदम यांचे किर्तन या ठिकाणी होणार आहे.
राज्यातील बळीराजा व ग्रामीण जनता सध्या पाण्याच्या टंचाईचा सामना करत असताना वाढदिवस साजरा करणे योग्य नाही, अशी भूमिका घेत सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना हार, तुरे, पुष्पगुच्छ, फलकबाजी किंवा सत्कार टाळण्याचे आवाहन केले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च दुष्काळग्रस्त भागातील गरजूंना पाणी, चारा व जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी उपयोगात आणावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
काटेवाडी येथे होणाऱ्या या कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून केवळ अध्यात्मिकच नव्हे, तर सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे. या कीर्तन सोहळ्यास भाविकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देऊन सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय द्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.










