राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू गाळप हंगामात पाच हजार रुपये प्रति टन ऊस दर द्यावा, या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गव्हाणीत घुसून जोरदार घोषणाबाजी करत ऊस गाळप काही काळ बंद पाडले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे कारखान्याच्या कामगारांचे आणि प्रशासनाची धावपळ उडाली.
राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमरसिंग कदम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. १५) भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात दुपारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते “ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन पाच हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे” अशा घोषणा देत कारखान्यात घुसले. कारखान्याच्या ऊस गाळपासाठी जाणाऱ्या ऊस गव्हाणीत जाऊन त्याठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ऊस गाळप बंद केले.
अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे ऊस तोडणी कामगार, कारखान्याच्या कामगारांची धांदल उडाली. अखेर पोलीस प्रशासनाला पाचारण करावे लागले. तरीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन चालू ठेवल्याने कारखाना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अगोदरच रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने साखर वाहतूक बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यातच आता खासदार राजू शेट्टी यांची शेतकरी संघटनाही या आंदोलनात उतरली आहे.
या दुहेरी आंदोलनामुळे मागील आठ दिवसांपासून कारखाना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन पाच हजार ते साडेसात हजार रुपये ऊस दर मिळावा, साखरेला ७० ते ८० रुपये किलो दराने विक्री करावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.










